सहा भारतीय अभियंत्यांचे अफगाणिस्तानातून अपहरण

    दिनांक  06-May-2018

 
अफगाणिस्तानात एका विद्युत कंपनीत काम करणाऱ्या ६ भारतीय कर्मचाऱ्यांचे अपहरण आज काही अद्यात बंदूक धारकांनी केले आहे. अफगाणिस्तानातील बाघलन प्रांतातील उत्तर भागात ही घटना घडली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने या घटनेला दुजोरा दिला असून, आपण अफगाण सरकारसोबत सतत संपर्कात असल्याची माहिती देखील दिली आहे.
 
 
अफगाणिस्तानातील टोलो न्यूज नामक स्थानिक वृत्त संस्थेने याची सर्वप्रथम माहिती दिली. बाघ-ए-शामल नावाच्या गावात चालणारी के.ई.सी. नावाच्या कंपनीत काम करणारे हे कर्मचारी होते. अपहरण केलेल्यांपैकी ६ भारतीय असून १ अफगाण नागरीक आहे. विद्युत क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीच्या कामानिमित्त हे कर्मचारी प्रवास करत होते.
 
 
या घटनेची माहिती मिळताच आम्ही अफगानिस्तान सरकारशी संवाद साधला आहे. भारत सरकार पूर्णपणे त्यांच्या बचावासाठी कार्यरत आहे, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिली आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती मिळताच पुढील माहिती दिली जाईल, असे देखील परराष्ट्र व्यवहार खात्याने कळविले आहे.