वसुंधरेची अथांग सेवा करणाऱ्या निसर्गपुत्रांचा सन्मान; दै. मुंबई तरुण भारत आणि महाएमटीबीचा ‘अनुभवा वनदुर्गेचा जागर’ सोहळा दिमाखात संपन्न

    09-Jun-2026   

Vandurga
 
मुंबई : (Mumbai Tarun Bharat) जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दै. 'मुंबई तरुण भारत' आणि 'महाएमटीबी' ने आयोजित केलेल्या 'एसएफसी एन्व्हायर्नमेंटल अॅवॉर्ड फॉर स्पिसीज अॅण्ड हॅबिटॅट्स वॉरियर्स २०२६' या पुरस्कार सोहळ्यात १८ वनसंवर्धकांचा सन्मान करण्यात आला. प्रभादेवी येथील रविंद्र नाट्य मंदिरच्या मुख्य सभागृहात सोमवार दि. ८ जून रोजी सायं. ७ वाजता ‘अनुभवा वनदुर्गेचा जागर’ हा विशेष सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला. निसर्ग, पर्यावरण आणि वनसंस्कृतीचा जागर करणाऱ्या या सोहळ्याला मुंबईसह राज्याच्या अन्य ठिकाणाहून प्रेक्षकवर्ग उपस्थित होता.
 

MUMBAI TARUN BHARAT EVENT 
 
या दिमाखदार सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे आणि भाजप मुंबईचे अध्यक्ष अमीत साटम उपस्थित होते. त्याचबरोबर या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांची अतिथी म्हणून उपस्थिती होती. ज्यामध्ये एसएफसी एन्व्हायर्नमेंटल टेक्नोलॉजीज प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक संदीप आसोलकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळचे सदस्य सचिव राहुल रेखावार, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अविनाश ढाकणे, महाराष्ट्र वन विभागागाच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) एम. श्रीनिवासा राव, महाराष्ट्र वन विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम. श्रीनिवास रेड्डी, एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक, सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत, कोकोयू कॅमलिनचे उपाध्यक्ष व कार्यकारी संचालक श्रीराम दांडेकर इ. मान्यवर उपस्थित होते.
 

MUMBAI TARUN BHARAT EVENT 
 

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे तब्बल ६० लोककलावंतांनी सादर केलेला वनदुर्गेचा जागर. या सादरीकरणाला मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज कलाकार पं. मयुर वैद्य, मानसी नाईक, विराजस कुलकर्णी, मेघा घाडगे, अनघा ठाकूर, महेश कापरेकर आणि मकरंद सावंत यांची दमदार साथ लाभली. नृत्य, संगीत आणि अभिनयाच्या या अभूतपूर्व संगमाने संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झाले होते. या संपूर्ण सोहळ्याचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध अभिनेते विराजस कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमादरम्यान कलाकारांनी सादरीकरणातून दिलेले पर्यावरण रक्षणाचे संदेश प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारे ठरले.
 

MUMBAI TARUN BHARAT EVENT 
 
हेही वाचा :  निसर्ग पर्यटन विकासासाठी ४८.४० हेक्टर शासकीय जमीन वनविभागाकडे हस्तांतरित; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पाठपुराव्याला यश
 
 

 
 
सोहळ्याची सुरुवात वनदुर्गेला वंदन करून पं. मयुर वैद्य यांच्या नृत्यसादरीकरणाद्वारे झाली. त्यानंतर 'कोंढाणा रॅट' नावाच्या दुर्मिळ उंदराची माहिती देणाऱ्या नाटकाने प्रेक्षकांना खळखळून हसवले. त्यानंतर अनघा ठाकूर यांनी 'इपिजिनिया देवरुख' या दुर्मिळ होत चाललेल्या वनस्पतीबाबत माहिती देणारा नृत्यविष्कार सादर केला. क्लायमेट चेंज या विषयावर नाट्यसादरीकरण करत लहान मुलांनी निरनिराळ्या कीटकांची पात्र साकारत प्रेक्षकांना खिळवून ठेवले. त्यानंतर अभिनेत्री मानसी नाईक यांनीही याच विषयाशी सुसंगत असे नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. समारोपाला जाताना निसर्ग साखळीतील महत्त्वाचा घटक असलेल्या 'घुबड' या विषयावर वनदुर्गेचा जागर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
 

MUMBAI TARUN BHARAT EVENT 
 
याप्रसंगी प्रकट झालेली वनदुर्गा (मेघा घाडगे यांनी साकारलेले पात्र) आणि त्यांनी नृत्याविष्करातून समाजापुढे मांडलेला विषय पाहून प्रेक्षक भारावून गेले. एकंदरीत, कला आणि पर्यावरण जागृतीचा हा सुरेख संगम असणारा 'वनदुर्गेचा जागर' प्रेक्षकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील असाच ठरला. मुंबई तरुण भारतचे वरिष्ठ प्रतिनिधी (पर्यावरण) यांनी उपस्थितांचे आणि सोहळ्याला हातभार लागलेल्या प्रत्येकाचे आभार मानले. वनदुर्गेचा हा अनोखा जागर शेवटी एका सुश्राव्य 'भैरवी'च्या सादरीकरणाने संपन्न झाला. (Mumbai Tarun Bharat)
 

MUMBAI TARUN BHARAT EVENT 
 
अनेक संस्थांचे मोलाचे योगदान
 
हा भव्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक संस्थांनी मोलाचे योगदान दिले. यामध्ये मुख्य प्रायोजक म्हणून एसएफसी एन्व्हायरमेंटल टेक्नॉलॉजी यांचा महत्वाचा सहभाग होता. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाऊर्जा यांनी सहप्रायोजक म्हणून भूमिका बजावली. तर आसमंत आणि एमएससी बँक या सहयोगी संस्था म्हणून पाठीशी उभ्या राहिल्या. रिसर्च पार्टनर म्हणून विवेक पार्क फाऊंडेशनचा सहभाग होता. माध्यम भागीदार म्हणून एबीपी माझा आणि रेडिओ सिटी यांनी काम पाहिले, ज्यामुळे हा जागर घराघरांत पोहोचण्यास मदत झाली.
 

MUMBAI TARUN BHARAT EVENT 
 
 
निसर्ग अभ्यासक आयझॅक केहिमकर यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार
 
निसर्ग आणि पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय आणि प्रदीर्घ योगदानासाठी प्रसिद्ध फुलपाखरु व किटक अभ्यासक आयझॅक केहिमकर यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. 'जीवशास्त्र' विषयातील शिक्षणाचा गंध नसताना त्यांनी स्वशिक्षणाने निसर्गविद्या प्राप्त केली. आज हा माणूस भारताचा 'बटरफ्लायमॅन' म्हणून ओळखला जातो. भारतात आढळणाऱ्या ७३५ प्रजातींच्या फुलपाखरांची नोंद त्यामध्ये आहे.
 

Mumbai Tarun Bharat 
 
'बीएनएचएस'मधील आपल्या ३८ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी फुलपाखरांवरील ३, रानफुलांचे १ आणि सागरी जीवांची ओळख करुन देणाऱ्या पुस्तकाचे लिखाण केले आहे. २०१७ साली 'बीएनएचएस'मधून सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी 'आयनेचर फाऊंडेशन'ची स्थापना केली. या फाऊंडेशनच्या माध्यमातून ते आता निसर्ग शिक्षणाचे धडे देत आहेत.
 

MUMBAI TARUN BHARAT EVENT 
 
कुशल पर्यावरणीय अभियंता डॉ. दिपक कांटावाला यांनाही 'जीवनगौरव'
 
पर्यावरण अभियांत्रिकी आणि प्रदूषण नियंत्रण क्षेत्रातील अद्वितीय योगदानासाठी भारतातील ज्येष्ठ पर्यावरण अभियंता व सल्लागार डॉ. दिपक कांटावाला यांनाही ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. कांटावाला यांनी औद्योगिक सांडपाणी व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रण, नदी प्रदूषण अभ्यास, सांडपाणी प्रक्रिया तंत्रज्ञान आणि पर्यावरणीय नियोजन या क्षेत्रांत तब्बल पाच दशकांहून अधिक काळ मार्गदर्शक आणि महत्त्वपूर्ण कार्य केले.
 

Mumbai Tarun Bharat 
 
 
डॉ. कांटावाला यांनी केवळ भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या ज्ञानाचा ठसा उमटवला. औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया, औषधनिर्माण आणि कीटकनाशक उद्योगांतील प्रदूषण नियंत्रण, कॉमन इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट्स आणि महानगरपालिका सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या उभारणीत त्यांचे योगदान अतुलनीय राहिले आहे. नदी खोरे, पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन आणि प्रदूषण प्रतिबंधक उपाययोजना या विषयांवर त्यांनी केलेले व्यापक काम आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरत आहे.
 

MUMBAI TARUN BHARAT EVENT 
 
सोहळ्यात अन्य १६ पर्यावरणरक्षकांचा गौरव
 
बडींग नॅचरलिस्ट पुरस्कार -
 
(१) मकरंद नाईक, नॅचारलिस्ट, दोडामार्ग
(२) नेचर गाईड, नांदुरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्य, नाशिक
 
यंग रिसर्चर पुरस्कार -
 
(१) डॉ. अमृत भोसले, गोगलगाय संशोधक, ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन
(२) डॉ. रेश्मा पितळे, सागरी जीवशास्त्रज्ञ, मुंबई
(३) राकेश आहुजा, बायोलॉजिस्ट, चंद्रपूर
 
कॉन्झर्वेशन ऍक्टिव्हिसम पुरस्कार
 
(१) महादरे इकोलॉजिकल रिसर्च इंटरडिसिप्लिनरी ऑर्गनायझेशन
 
कॉन्झर्वेशन कॉन्ट्रीब्युटरी पुरस्कार -
 
(१) डॉ. अपर्णा वाटवे, सडे अभ्यासक
(२) गोल्डन अर्थ बायोपिझर्व्ह फाऊंडेशन, धुळे
 
हॅबीटॅट कॉन्झर्वेशन पुरस्कार -
 
(१) फाऊंडेशन फॉर इकॉनॉमिक अॅण्ड इकॉलॉजिकल डेव्हलपमेंट (फीड)
 
इको-टुरिझम पुरस्कार -
 
(१) जलकन्या कांदळवन निसर्ग पर्यटन गट - तारामुंबरी, सिंधुदुर्ग
 
फॉरेस्ट स्टाफ पुरस्कार -
 
(१) गणेश कुरा, वनपाल-लातूर (सामाजिक वनीकरण विभाग)
(२) व्याघ्र स्थानांतरण टीम, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प
 
मरीन कॉन्झर्वेशन पुरस्कार -
 
(१) दक्षिण फाऊंडेशन - मरिन फ्लॅगशिप्स प्रकल्प
मुंबई वॉरियर्स पुरस्कार -
 
(१) मुंबई बर्डवॉचर्स क्लब
(२) सुनील अग्रवाल, पाणथळ संवर्धक, नवी मुंबई
 
श्रीकर अष्टपुत्रे स्मृती पुरस्कार -
 
(१) मकरंद केतकर, विचू संशोधक-निसर्ग अभ्यासक, पुणे
 
विशेष पुरस्कार :
 
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘गवताळ अधिवास पुनरुज्जीवन प्रकल्पा’साठी ‘विवेक पार्क फाऊंडेशन’च्या ‘वाईल्डलाईफ डिव्हिजन’ला विशेष सन्मान प्रदान करण्यात आला. (Mumbai Tarun Bharat)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर