मुंबई : (BEST Retired Employees) बेस्ट उपक्रमातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या देयकांच्या प्रश्नावर अखेर तोडगा निघाला आहे. आमदार प्रसाद लाड यांनी श्रमिक उत्कर्ष सभेच्या माध्यमातून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले असून, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना थकीत रकमेपैकी पहिला हप्ता म्हणून ५०० कोटींचा निधी वितरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'वर्षा' निवासस्थानी झालेल्या विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
आमदार प्रसाद लाड यांनी बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. "आपल्या आयुष्याची महत्त्वाची वर्षे बेस्ट सेवेसाठी देणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम वेळेत मिळायलाच हवी," अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली होती. शासनाच्या या निर्णयामुळे हजारो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.(BEST Retired Employees)
सदरील बैठकीत कर्मचाऱ्यांच्या संबंधी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.थकीत रकमेचा पहिला हप्ता म्हणून ५०० कोटींच्या निधीचे तात्काळ वितरण केले जाईल.बैठकीत बेस्टची आर्थिक पुनर्बांधणी, सेवा सुधारणा आणि कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली.सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या उर्वरित थकीत रकमेच्या वितरणासाठीही शासन सकारात्मक असून लवकरच आवश्यक कार्यवाही केली जाईल.
"बेस्टचे पुनर्जीवन हे केवळ संस्थेचे नव्हे, तर कर्मचाऱ्यांच्या सन्मानाचे पुनर्स्थापन आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन संवेदनशीलतेने काम करत आहे," असा विश्वास आमदार प्रसाद लाड यांनी व्यक्त केला, तसेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.(BEST Retired Employees)