मुंबई महानगर प्रदेशातील वाहतुकीला नवी गती; २२,६११ कोटींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना मंजुरी

    10-Jun-2026
Mumbai Infrastructure
 
मुंबई : (Mumbai Infrastructure) मुंबई महानगर प्रदेशातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत तब्बल २२ हजार ६११ कोटी रुपयांच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये घोडबंदर मार्गावरील गायमुख-फाउंटन हॉटेल भुयारी मार्ग, फाउंटन हॉटेल-भाईंदर उन्नत पूल तसेच नवी मुंबई मेट्रो विस्तार प्रकल्पांचा समावेश आहे.
 
या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत, मुख्य सचिव राजेश अग्रवाल आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 
घोडबंदर मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी गायमुख ते फाउंटन हॉटेल दरम्यान ५.८६ किलोमीटर लांबीचा सहा पदरी भुयारी मार्ग आणि फाउंटन हॉटेल ते भाईंदर दरम्यान ९.५८ किलोमीटर लांबीचा सहा पदरी उन्नत पूल उभारण्यात येणार आहे. सुमारे १७ हजार ३६ कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे पश्चिम मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, पनवेल आणि राष्ट्रीय महामार्ग-४८ यांच्यातील संपर्क अधिक वेगवान होणार आहे.
 
 
नवी मुंबई मेट्रो विस्ताराला मान्यता
 
याशिवाय सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो मार्ग १ए (सागर संगम-सीबीडी बेलापूर) आणि मार्ग २ (पेंधर-नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टी-४) या ५ हजार ५७५ कोटी रुपयांच्या विस्तार प्रकल्पालाही मंजुरी देण्यात आली. या विस्तारामुळे सागर संगम ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा २८ किलोमीटरचा अखंड मेट्रो मार्ग उपलब्ध होणार असून त्यामध्ये १३ नवीन स्थानकांचा समावेश असेल.(Mumbai Infrastructure)
 
 




संबंधित मजकूर