मुंबई : भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पोस्टर फाडून आ. जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेबांचा अवमान केल्याप्रकरणी भाजप अनुसूचित जाती मोर्चा, मुंबई आक्रमक झाली आहे. आव्हाड यांच्या विरोधात त्वरीत गुन्हा नोंदविण्याची मागणी पंतनगर पोलीस ठाण्यात भाजपकडून करण्यात आली आहे. तसेच, आव्हाड यांना अटक झाली नाही तर भाजप अनुसूचित जाती मोर्चा मुंबई व महाराष्ट्राच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, दि. २९ मे रोजी महाड चवदार तळे येथे जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीच्या विरोधात आंदोलन करताना जाणीवपूर्वक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पोस्टर फाडले. भाजप अनुसूचित जाती मोर्चाकडून तीव्र शब्दांत जाहीर निषेध करण्यात आला असून चवदार तळ्याच्या समोर बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या पवित्र भूमीत बाबासाहेबांचा फोटो असलेला पोस्टर फाडणे, हा बाबासाहेबांचा घोर अवमान असल्याचे भाजपने म्हटले आहे.
सदर अनुचित प्रकारामुळे आंबेडकरी जनतेमध्ये तीव्र असंतोष पसरलेला असून जितेंद्र आव्हाड सारख्या घटनात्मक पदावर काम करणाऱ्या व्यक्तीविरोधात तात्काळ गुन्हा नोंदवून अटक करावी, अशी मागणीच भाजपकडून केली आहे. तसेच, पर्यायाने सामाजिक जातीय तेढ निर्माण केल्यामुळे अनुसूचित जाती प्रतिबंधात्मक कायद्यानुसार कार्यवाही करण्यात यावी, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.