झारखंडच्या सरस्वती देवींची अनोखी राम भक्ती; ३० वर्षे मौन व्रताचे केले पालन!
08-Jan-2024
Total Views | 93
रांची : येत्या २२ जानेवारीला अयोध्येत राममंदिराचे उद्घाटन होणार आहे. या सोहळ्यासाठी भारतभर जोरदार तयारी सुरु आहे. ५०० वर्षांच्या संघर्षांनंतर आज हे मंदिर बनत असल्याने भारतभर या दिवशी दिवाळी साजरी केली जाणार आहे. झारखंडच्या धनबाद येथील सरस्वती देवी यांचे अनोखे व्रतही यानिमीत्ताने पूर्ण होणार आहे.
सरस्वती देवी या ८५ वर्षांच्या आहेत. अयोध्येत राम मंदिर व्हावे यासाठी त्या गेली ३० वर्षे मौन व्रताचे पालन करत आहेत. २२ जानेवारी २०२४ रोजी रामललाच्या मूर्तीला अभिषेक होताच त्यांचे हे व्रत पुर्ण होणार आहे. सरस्वती देवी यांनी १९९२ मध्ये हे मौनव्रत सुरू केले होते. ६ डिसेंबर १९९२ रोजी स्वामी नृत्य गोपाल दास यांच्या आदेशानुसार त्यांनी मौन व्रत पाळण्यास सुरुवात केली. याच दिवशी सरस्वती देवी यांनी संकल्प केला की, राम मंदिराच्या अभिषेकाच्या दिवशीच त्या हे व्रत तोडतील.
त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्या निर्णयाचे स्वागत केले आणि त्यांना पूर्ण पाठिंबा दिला. यानंतर त्यांचा जवळपास सर्व वेळ उपासनेत गेला होता. त्यांना राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रणही देण्यात आले आहे. रामलल्लांनी मला प्राण प्रतिष्ठेसाठी बोलावले आहे. माझी तपश्चर्या पुर्ण झाली, माझे जीवन सफल झाले अस मत त्यांनी व्यक्त केले. त्यांना मिळालेल्या आमंत्रणामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब आनंदी झाले आहे.