मुंबई : 'माझी माती माझा देश' आयोजित कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. आदित्य ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला. दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेंनी मुंबईच्या प्रवेशद्वारावरील टोल नाके बंद करण्याची मागणी केली होती. त्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहिलं होतं. यावरुनच उपमुख्यमंत्र्यांनी असच पत्र त्यांनी स्वत:ला 25 वर्ष लिहायला हवं होतं, असं म्हणत टोला लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, "रोज ते तुमच्यावर बोट उचलतील, तुम्ही त्यांन संधी देऊ नका. मी चहल यांना सांगीन, की तुम्ही चांगल काम करताय. एक बरं आहे, निंदकाच घर असावे शेजारी, आपल्या शेजारी ते बसले आहेत. पारदर्शी, प्रामाणिकपणे काम करा. मुंबई बदलतेय, अशाच पद्धतीच काम केलत, तर खड्डेमुक्त मुंबईच मुख्यमंत्र्यांच स्वप्न तुम्ही पूर्ण करु शकता. सध्या चांगली कामं सुरु आहेत. त्यामुळे काहीच्या पोटात दुखत आहे. पोटात दुखत असल्याने काही लोक रोज पत्र लिहित आहेत. काँक्रिट रस्त्याची कामं चालली आहेत. अर्थात चांगली काम चालतात, तेव्हा काही लोकांच्या पोटात दुखतं, तेव्हा ते रोज एक पत्र लिहितात. अशाच प्रकारच एक पत्र त्यांनी स्वत:ला 25 वर्ष लिहिलं असतं, तर कदाचित मुंबई अधिक चांगली झाली असती.” असा फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.