राष्ट्रगायत्रीची दीक्षा देणारा महंत

    07-Aug-2023
Total Views | 120
Article On Madandas Devi Written By Kishore Paunikar Narmadapurkar

लाखो नवयुवकांना राष्ट्रगायत्रीची दीक्षा देत त्यांचा देशभक्तीपर नवजन्म घडवणारे मदनदासजी दि. २४ जुलै रोजी आपल्या जीवनाची पुर्णाहूती राष्ट्रयज्ञात टाकून अनंताच्या पुढील आदेशासाठी नवचैतन्यमय व्हायला रिकामी झोळी इथेच ठेवून गेले...

अंदाजे १२ वर्षांपूर्वीची गोष्ट. माझ्या एका मित्राच्या वडिलांनी माझे उच्चार व वागणूक बघत माझी जात शोधून काढली होती. याबद्दल त्यांना काय काय माहिती आहे, तेही वेळ प्रसंगी ते सांगत. एकदिवस ते मला म्हणाले, “मुंज वा मौंज म्हणजे काय ते सांग!” आपले अगाध ज्ञान प्रगटू नये म्हणून मी म्हटले, “काका, आपणच सांगा ना!”

ते म्हणाले, “मौंज म्हणजे द्विज बनणे. द्विज म्हणजे द्वितीय जन्म...
जन्मना जायते शूद्रः, संस्काराद् द्विज उच्यते।
वेदपाठाद् भवेद् विप्रः, ब्रह्म जानाति ब्राह्मणः॥”
हा श्लोकही त्यांनी ऐकवला होता.

गृहस्थाश्रमी व्यक्तीने प्रजोत्पत्ती करणे म्हणजे पितरांच्या ऋणातून मुक्त होणे असे समजले जाते. पण, तो व्यक्ती पिता झाल्यावर मुलाची मौंज करून त्याला गायत्री उपदेश करणे, हेही त्या पित्याचे कर्तव्य असते. ‘गायनात् त्रायते इति गायत्री’ असा गायत्रीचा अर्थ सांगितला जातो. गायत्री मंत्र देण्याचा अधिकार वडिलांचा असतो. त्यामुळेच पित्याला प्रथम गुरू मानले जाते. गायत्रीचा उपदेश झाला की, त्या मुलाचा ‘मी व माझे’ या पलीकडील विद्या ग्रहण करणारा ब्रह्मचर्याश्रम सुरू होतो.

आज ‘मौंज’ व ‘द्विज’ ही वरील घटना आठवण्याचे कारण म्हणजे, आम्हा सर्व नवयुवकांच्या कानात राष्ट्रगायत्री फुंकत आम्हाला देशभक्तीपर नवजन्म देणारे सामाजिक गुरू मदनदासजींचे निधन! मदनदासजी अभाविपचे काम करत. विद्यार्थ्यांमध्येच काम करत असल्याने संपर्कात आलेल्या पौगंडावस्थेतील मुलावर त्याच्या समजेनुसार राष्ट्रभक्तीचे संस्कार करत. ते त्याला भौतिक जन्मानंतरचा देशभक्तीपर जन्म देत. राष्ट्र गायत्रीचा उपदेश करत देशभक्तीपर आचरण शिकवणारे त्या नवयुवकांचे ते सामाजिक पिता व सामाजिक गुरूच होते.

मदनदासजींनी एकदा कानात राष्ट्रगायत्रीचा (देशभक्तीचा) मंत्र फुंकला की, या नवयुवकांचा दुसरा म्हणजे सामाजिक जन्म होई; ही प्रक्रिया त्या युवकाची सामाजिक मुंजच असे. मग त्या नवयुवक बटूच्या हातात दंड असण्याऐवजी खांद्यावर शबनम बॅग व त्यात दैनंदिनी म्हणजे डायरी येई. ‘मातृमंदिर का समर्पित दीप मै, चाहता हू मै जलता रहूं...’ अशा परिषद गीतांची आळवणूक करत हा नित्य संपर्कासाठी कायम घराबाहेर राही.

’महंतें महंत करावे। युक्तिबुद्घीने भरावे।
जाणते करून विखरावे। नाना देशीं।
या समर्थ वचनाचे मदनदासजी तंतोतंत पालन करत होते. मदनदासजींशी संपर्क आला की त्या नवयुवकाचे राष्ट्रगान सुरू होई व ‘मी एकल व्यक्ती वा कुटुंबापुरता’ ही वृत्ती गळून पडत ‘आम्ही व आमचे’ अशी विशाल वृती तयार होत आणि एक दिवस तो आपले घर सोडून राष्ट्रकार्यार्थ घराबाहेर पडायचा....
मग हा नवमहंत इतरांनाही आपले घर सोडण्यासाठी साद घालत फिरायचा...

कबीरा खड़ा बाजार में, लिए लुकाठी हाथ
जो घर फूंके आपनौ, चले हमारे साथ
हातात शबनम बॅग घेऊन घर सोडणार्‍या राष्ट्रभक्तांची मांदियाळी संपूर्ण भारतभर अशीच पसरत गेली.

जिथे आजच्या युगातला नवयुवक करिअर व बँक बॅलन्सची चिंता करत असतो, मदनदासजींचा कानमंत्र मिळताच त्याची स्वार्थी वृत्ती गळून पडत ‘ॐ भवति भिक्षांदेहि’ अशी समाजाधारित वृत्ती बनायची. ही भिक्षा पोटार्थी नसायची. घराघरातले तरुण मुलं राष्ट्रकार्यार्थ मागितले जात होते. महंत ‘बनणे’ व ‘बनविणे’ सतत सुरू होते....

सामाजिक स्थिती अनुकूल असो वा प्रतिकुल, मदनदासजींनी आवाज द्यावा व नवयुवकांनी सुखावर लाथ मारत घराची चौखट ओलांडत स्वतःची शबनम बॅग घेऊन मदनदासजींनी सांगितले. तिथे जाऊन नित्य नवे महंत तयार करायला लागावे, असे प्रती गुरुकुल तयार होत होते. या गुरूकुलातील एका महंताला मदनदासजींनी गृहस्थाश्रम आचरायला घरी पाठवले की आणखी चार महंत राष्ट्रयज्ञात आपली आहुती टाकायला समोर येत. राष्ट्रगायत्रीचा जप करत युक्तीबुद्धीने भरलेले हे युवकच देशाला राष्ट्रानुकूल नेतृत्त्व प्रदान करत पुनःप्रतिष्ठित करतील, या तत्त्वावर मदनदासजींची अगाढ श्रद्धा होती....

लाखो नवयुवकांना राष्ट्रगायत्रीची दीक्षा देत त्यांचा देशभक्तीपर नवजन्म घडवणारे मदनदासजी दि. २४ जुलै रोजी आपल्या जीवनाची पुर्णाहूती राष्ट्रयज्ञात टाकून अनंताच्या पुढील आदेशासाठी नवचैतन्यमय व्हायला रिकामी झोळी इथेच ठेवून गेले...

आम्हा नवयुवकांचा काश्मीरचा पहिला संबंध मदनदासजींमुळेच १९९०ला आला होता. तेव्हा काश्मीर बचाव आंदोलनादरम्यान, ‘जहां तिरंगे का हुआ अपमान वहीं करेंगे उसका सम्मान’ म्हणत आम्ही मदनदासजींच्या नेतृत्वाखाली श्रीनगरच्या लाल चौकाकडे जाताना आम्हाला उधमपूर येथे अटक झाली होती. आपल्याला लाल चौकात जायचेच राहून गेले, ही खंत नेहमी वाटत होती. मदनदासजींचे निधन झाल्याची बातमी कळली, तेव्हा मी काश्मीरला सिंधू नदी किनारीच होतो. बाकी पर्यटन सोडून मदनदासजींचे शिष्य असलेले आम्ही दोघं मी व स्वाती श्रीनगरच्या लाल चौकात गेलो व तिथे मदनदासजींना श्रद्धांजली अर्पण केली.
 
‘बहुनि मे व्यतितानि जन्मानि तवचार्जुन...’ या पूर्व व पुनर्जन्माच्या भगवंत वाक्याप्रमाणे मदनदासजींनी आपले हे आयुष्य राष्ट्रानुकूल महंत घडवण्यात खर्ची घातले. पुढे विश्वबंधुत्त्व स्थापन करायला भगवंताकडून नवचैतन्य प्राप्त करत विश्वानुकूल महंत घडवायला मदनदासजी पुन्हा अवतरित होतील, हा त्यांनी घडलेल्या प्रत्येक महंताला विश्वास आहे.
आपल्या या देहातील शेवटचा श्वास सोडताना त्यांनी भगवंताला नक्कीच म्हटले असावे....

नलगे मुक्ती धन संपदा
राष्ट्रभक्ती देई सदा
मदनदास म्हणे गर्भवासी
सुखे घालावे आम्हासी
आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्रगायत्रीची दीक्षा देत नवनवे महंत तयार करत राष्ट्र जीवनाला उज्ज्वल दिशा देत अनंताच्या प्रवासाला निघालेल्या मदनदासजींना भावपूर्ण श्रद्धांजली!

ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पुर्ण मुदच्यते।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते॥
ॐ शांती शांती शांती!
मदनदासजींनी दिलेल्या राष्ट्रगायत्रीचा अखंड जप करणारा एक महंत.

किशोर पौनीकर नर्मदापुरकर
९८५०३५२४२४/८३२९०९३३०५

 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121