जीवनातील मदनदासजी पर्व!

    07-Aug-2023
Total Views | 86
Article On Madandas Devi Written By Baba Deshpande

२४ जुलै रोजी सकाळी मदनदासजींच्या दुःखद निधनाची वार्ता समजली. मदनदासजी रा. स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक सह-सरकार्यवाह तसेच विद्यार्थी परिषदेचे अखिल भारतीय संघटनमंत्री म्हणून आयुष्याचे अर्ध शतक म्हणजे ५० वर्ष समर्पित जीवन जगलेले व्यक्तिमत्व, उच्च शिक्षा प्राप्त विभूती. मला त्यांचा परीसस्पर्श झाला ते वर्ष होते १९८२!

दोन दिवस झाले, मनात फक्त मदनदासजींच्या अनेक आठवणी जागृत झाल्या. जून १९८२ मध्ये वनवासी ग्राम आडगाव ता. अकोट, जिल्हा अकोला या वनवासी गावात विदर्भ प्रांताचा अभाविपचा अभ्यास वर्ग होता. मी तेव्हा अकोला जिल्हा संघटनमंत्री म्हणून कार्यरत होतो. १५ दिवस अकोटमध्ये व्यवस्था म्हणून विस्तारक होतो. वर्गाच्या प्रारंभीच जोरदार पाऊस आला. आम्ही अकोटवरून ट्रॅक्टरमध्ये सर्व सामग्रीसह वर्गस्थानी निघालो. रस्त्यातच पाऊस लागला. मुसळधार पाऊस, वादळ, वारं अशात समोर जाणे शक्य नव्हते. आम्ही एका झाडाखाली थांबलो. किराणा व अन्य साहित्य पावसात चिंब ओले झाले. कणीक तर ट्रॅक्टरमध्येच भिजवली गेली.

विनायक सोहोळे, सुभाष, दीपक आसरकर, बंड्या ठोकळ, जयंत पाठक, शंभू चव्हाण असे इतरही कार्यकर्ते सोबत होते. तन, मन गच्च भिजलेले होते. तरुण वय, सोबत मनात रुजू पाहत असलेले अभाविप विचार, प्रेरक गीते उत्स्फूर्तपणे आमच्या तोंडी एक गीत आले, ‘आंधी क्या हैं तुफान मिले, चाहे जितने व्यवधान मिले, बढना ही अपना काम हैं, बढना ही अपना काम हैं.’संपूर्ण प्रांतातून कार्यकर्ते पोहोचत होते. तेदेखील सामानासह ओलेगच्च झालेले. थंडीने शरीर कुडकुडत होते. थर थर कापत होते. पण, मनात मात्र अभाविपची ज्ञान, चारित्र्य, एकता ही मशाल चेतलेली होती. या कार्यकर्त्यांकडे पाहून ‘वन्ही तो चेतवावा चेतविताची चेततो’ या समर्थ रामदासांच्या श्लोकाची प्रत्यक्ष रोकडा प्रचिती येत होती. सकाळी अभ्यासवर्गाचे उद्घाटन होणार, आम्ही पहाटे ४ वाजेपर्यंत व्यवस्थेत गुंतलो होतो. माझ्या मनी ओढ होती ती सकाळी येऊन पोहोचणार्‍या मदनदासजींची. गेली दोन वर्ष सतत ऐकत होतो, त्यांच्याविषयी. आज प्रत्यक्ष दर्शन होणार होते. आतापर्यंत जबाबदारी घेऊन असे काम कधीच केले नव्हते. आज ही प्रेरणा आपल्यात कुठून आली? या प्रश्नाचे उत्तर मिळाले ते पुढे तीन दिवस मदनदासजींच्या सान्निध्यात राहूनच!
 
अभ्यास वर्गात प्रथमच मी विषय मांडायला उभा राहिलो. विषय होता, परिषदेचे तीन आग्रह. खूप तयारी केली होती. पण, व्यक्त होता आले नाही. दहा मिनिटांत नि:शब्द झालो, घाबरलो आणि खाली बसलो. एक दडपण आले होते. कारण, समोर बसले होते, मदनदासजी, सदाशिवराव, बाळासाहेब दीक्षित. सत्रानंतर लगेच मला मदनदासजींनी कक्षात बोलाविले आणि शांतपणे धीर देत विषय मांडणी, विषय कसा फुलवायचा, आपला शब्दसंग्रह कसा असावा, एकाच अर्थाचे अनेक शब्द कसे वापरावे, जेणेकरून आपले बोलणे प्रभावी होईल, असे समजावून सांगितले आणि म्हणाले, “बाबा, आपण वक्ता म्हणून प्रभावी नाही, तर अभाविप विचार कृतिरुप होईल म्हणून मांडला पाहिजे. आपण मोठे नाही, तर संघटन उच्च स्थानी पोहोचले पाहिजे.” संघटनेच्या सर्वोच्च कार्यकर्त्याने पाठीवर हात ठेवला. पहिल्या भेटीतच आपुलकीने, प्रेमाने ‘बाबा’ म्हणणारे मदनदासजी! असे वाटले की, त्यांची नि आपली जन्मोजन्मीची ओळख आहे.

हाच माझ्या जीवनात झालेला परीसस्पर्श. तेथून त्यांच्या अनेक भेटी होत गेल्या. त्यांच्या त्यागपूर्ण व्यवहारातून सहज संस्कार होत गेला. स्वामी विवेकानंद ‘ग्रंथावली’ त्यांनी मला आग्रहपूर्वक वाचायला लावली. माझ्यात संघ प्रचारक व कल्याण आश्रम पूर्णवेळ कार्यकर्ता बनण्याची बीजं व त्यासाठी मनाची जमीन मदनदासजींनी तयार केली. १९९४ मध्ये संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीत मदनदासजी संघाचे सहसरकार्यवाह झाले. मी व्यवस्थेत होतो. आम्ही भेटलो, मला म्हणाले, “बाबा, जीवनात पुढे काय?” आणि त्याच स्थानी माझा प्रचारक निघण्याचा विचार पक्का झाला. मदनदासजींची शेवटची भेट प्रशांत कुटीरम्, बंगळुरुला झाली. सोबत वैशाली व आमची मानस कन्या डॉ. दोनिरूंग रीयांग पण होती. ती त्यांना आरोग्य सेवा देत होती. बाबा सहपरिवार पूर्णवेळ समाजाचे काम करतो, यांचे समाधान व आनंद त्यांच्या चेहर्‍यावर व बोलण्यात तेव्हा होता. अशा अनेक आठवणी मनाच्या कप्प्यात मदनदासजी आजही आहेत. भविष्यात त्यांच्या याच आठवणी आता प्रेरणा देणार आहेत.

मदनदासजी संघटनशास्त्राचे द्रष्टा ऋषी होते. त्यांनी असंख्य कार्यकर्ते या संघटनरुपी सागरात तयार केले. मी किती तयार झालो माहीत नाही. पण, एक बिंदू म्हणून त्यांच्याच कार्यात आहे.

मदनदासजींना माझी व माझ्या परिवाराची अश्रुपूर्ण श्रद्धांजली!
 
बाबा देशपांडे


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121