वाजपेयींना वंदन करून नड्डांनी केली मिशन मुंबईला सुरुवात !

मुंबईत दिसणार गुजरात पॅटर्नची झलक ; भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी

    18-May-2023
Total Views | 30
bjp

मुंबई
: राज्याच्या सत्तेत कमबॅक केल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांवर फोकस केलेल्या भाजपने मुंबई महापालिकेसाठी कंबर कसून तयारी सुरु केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे सध्या दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर असून बुधवारी त्यांनी मुंबईत अनेक कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवत भाजपच्या मिशन मुंबईचे बिगुल वाजवले आहे. माजी पंतप्रधान आणि भाजपचे संस्थापक अध्यक्ष भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या बोरिवली येथील पुतळ्याला अभिवादन करत आपल्या मिशन मुंबईला सुरुवात केली आहे.

मुंबईतील बोरिवली येथील अटल स्मृती उद्यानात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या 'बौद्धिक मेळाव्यात' हजेरी लावली. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवन प्रवासाचे चित्रण आणि जतन करणाऱ्या प्रदर्शनालाही भेट दिली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, महाराष्ट्र प्रभारी सीटी रवी, मंत्री मंगल प्रभात लोढा , भाजपा मुंबई अध्यक्ष अॅड. आशिष शेलार, खासदार मनोज कोटक, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार सुनील राणे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

देशातील सर्वाधिक प्रतिष्ठेची समजली जाणारी मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपने सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरु केले असून त्याचाच एक भाग म्हणून नड्डांच्या दौऱ्याकडे पाहिले जात आहे. तसेच या दौऱ्यात अध्यक्षांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना जनतेशी संवाद कायम ठेवण्याचा संदेश देत कानमंत्रही दिला आहे. तसेच गुजरातच्या धर्तीवर मुंबईतही पन्ना प्रमुखांच्या नियुक्तीचा पॅटर्न दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जे पी नड्डांकडून कार्यक्रमांचा धडाका !

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा बुधवार आणि गुरुवार या दोन दिवसांसाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी बुधवारी मुंबईतील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून सामाजिक समीकरणे जुळवणे, मुंबईकरांना भाजपाविषयी संदेश देणे, केंद्र सरकारच्या वतीने करण्यात येत असलेल्या योजनांची माहिती देणे, योजनांचा फायदा मिळालेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधणे, मुंबई भाजप कोअर कमिटीची बैठक घेऊन संघटनेची मुंबईतील ताकद जाणून घेणे असे अनेक हेतू साध्य करण्याचा प्रयत्न केला. मुंबईत आगमन झाल्यानंतर नड्डांनी सर्वप्रथम देवनार येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर केंद्र - राज्य सरकारच्या योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांच्या आयोजित करण्यात आलेल्या घाटकोपर येथील संवाद कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. तसेच घाटकोपरच्या रमाबाई नगर येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करत दौऱ्याला सुरुवात केली.

गुजरात पॅटर्नची महाराष्ट्रात पुनरावृत्ती ?

चारकोप येथे झालेल्या पन्ना प्रमुखांच्या संमेलनात त्यांनी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधत पन्ना महाराष्ट्रात गुजरातप्रमाणेच पन्नाप्रमुख पॅटर्न राबवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रत्येकी ६० मतदारांच्या मागे एक याप्रमाणे मुंबईत एकूण २ लाख ७० हजार पन्नाप्रमुख नियुक्त करून मुंबईकरांशी कनेक्ट राहण्याचे नियोजन भाजपकडून करण्यात आले आहे. यापैकी काही पन्नाप्रमुखांची नेमणूक करण्यात आली असून उर्वरित नियुक्त्या लवकरच होतील, असे सांगण्यात आले आहे. प्रत्येकी ६० मतदारांच्या मागे एक याप्रमाणे नेमण्यात येणाऱ्या पन्नाप्रमुखांकडे भाजपकडून राबवण्यात येणारे सर्व कार्यक्रम जनतेपर्यंत पोहोचविणे, जनतेशी संपर्कात राहणे आणि त्यांना भाजपशी कनेक्ट ठेवणे या जबाबदाऱ्या देण्यात येणार आहेत. ''आपण जनतेपर्यंत किती वेळा पोहोचतोय यापेक्षा आपण त्यांच्याशी किती वेळात जोडले जात आहोत ? जनता आपल्याशी संवाद साधत आहे का ? आपण लोकांचे म्हणणे ऐकून घेत आहोत का ? संवाद साधत आहोत का ? यावर कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावे,'' असा कानमंत्रही भाजप अध्यक्षांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. या माध्यमातून मुंबईतील दीड कोटींपेक्षा अधिक मुंबईकरांशी संपर्क करून मुंबई महापालिकेवर आपला झेंडा फडकविण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरु झाले आहेत.

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा लाभार्थ्यांशी संवाद

भाजपाध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी घाटकोपर येथे आयोजित लाभार्थी संमेलनात केंद्र सरकारच्या वतीने राबवण्यात आलेल्या योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ''भारतातील अतिगरीबीचे प्रमाण आता एक टक्क्यांहून खाली गेले आहे. समाजात हे परिवर्तन सर्वांना एकत्रित करून त्यांचा विकास करून हे शक्य झाले आहे. सरकारी योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा आमचे 'अंत्योदयाचे' स्वप्न पूर्ण करण्यात आम्हाला यश आले आहे. गेल्या ९ वर्षांमध्ये २५ लाख कोटी रुपयांचा लाभ कुठल्याही दलालाची मदत न घेता विविध योजनांच्या माध्यमातून लोकांच्या खात्यात पोहोचवण्यात सरकार यशस्वी झाले आहे. देशातील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत निश्चित रक्कम देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. ९ कोटी ५ लाख महिलांना लाकडाच्या चुलीवर कराव्या लागणाऱ्या स्वयंपाकातून आणि त्यातून होणाऱ्या आजारातून बाहेर काढण्याचे काम मोदी सरकारने केले आहे,'' असेही नड्डा यांनी अभिमानाने यावेळी नमूद केले.

नड्डांकडून मविआवर निशाणा

जे पी नड्डांनी यावेळी बोलताना महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळावर ताशेरे ओढत निशाणा साधला. '' महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्य काळात फक्त भ्रष्टाचार होता. राज्यात सुरु होत असलेल्या प्रत्येक काम थांबवायचे उद्योग मविआ सरकारच्या काळात झाले होते. मात्र या सगळ्यापासून जनतेची सुटका झाली असून आता राज्यात डबल इंजिन सरकार विकासाचे काम करत आहे. अशाच अशाच पद्धतीचा आशीर्वाद आम्हाला द्या,'' या शब्दांत त्यांनी मुंबईकर जनतेकडे भाजपाला पाठिंबा देण्याचे साकडे घातले आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121