रामनवमी, हनुमान जन्मोत्सवाबाबत जितेंद्र आव्हाड यांचे संतापजनक वक्तव्य!
22-Apr-2023
Total Views |
(Jitendra Awhad on Ramnavami)
हेही वाचा...
वाचाळवीर आव्हाडांवर गुन्हा दाखल करा ; भाजप नेत्यांचे मुंबई पोलिसांना पत्र
हिंदू विरोधी वक्तव्यामुळे हिंदू समाजात संताप - पवन त्रिपाठी
मुंबई : माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हिंदू देवी-देवता आणि हिंदू सणांवर केलेल्या अवमानकारक वक्तव्याविरोधात भाजप नेत्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. हिंदू सणांच्या वेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर अशोभनीय वक्तव्य करून, जितेंद्र आव्हाड यांनी धार्मिक भावना दुखावल्या आहेत, असा आरोप मुंबई भाजप नेत्यांनी केला आहे. हिंदूंच्या भावना दुखावणारे विधान करणाऱ्या वाचाळवीर आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मुंबई भाजपच्या शिष्टमंडळाने मुंबई पोलीस उपायुक्तांकडे केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामनवमी आणि हनुमान जयंती मिरवणुकीला जातीयवादी ठरवून, समाजात तेढ पसरवण्याचा प्रयत्न केला आहे असा आरोप करत मुंबई भाजपचे उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी आव्हाडांवर एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. ''राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत जितेंद्र आव्हाड यांनी हिंदू देवतांबद्दल अशोभनीय वक्तव्य केले. आव्हाड सातत्याने हिंदू देवता, हिंदू आणि हिंदुत्वावर अवमानकारक वक्तव्य करत आहेत. रामनवमी आणि हनुमान जयंती केवळ दंगल पसरवण्यासाठी आहे. या दंगलींमुळे शहरातील वातावरण बिघडत आहे. मला वाटते की येणारे दिवस जातीय दंगलीचे असतील, असे प्रक्षोभक विधान आव्हाडांनी केल्याचे त्रिपाठींनी म्हटले आहे.
"श्रीरामनवमी आणि हनुमान जयंती हे हिंदूंचे प्रमुख सण आहेत, जे हजारो वर्षांपासून हिंदू समाज साजरे करत आहे. हिंदू स्वतःला श्रीरामाचे वंशज मानतात आणि हनुमानजी हे श्रीरामाचे परम भक्त आहेत, ज्यांना संकटमोचक म्हणतात!" आव्हाडांचे हिंदू समाजाच्या विरोधातील हे वक्तव्य महापालिका निवडणुकीत राजकीय फायद्यासाठी करण्यात आल्याचा आरोप त्रिपाठी यांनी केला आहे. ''आगामी निवडणुकीत अल्पसंख्याकांना खूश करण्यासाठी केलेल्या अशा विधानांचा आम्ही विरोध करत आहोत. कोट्यावधी जनता ज्या हिंदू देवी- देवतांना पुजते, त्यांच्या विरोधात अशा विधानांची गरज नाही. एका चांगल्या हेतूने आयोजित केलेल्या कार्यक्रमात आव्हाड यांनी फालतू वक्तव्य केल्यामुळे, हिंदू समाज दुखावला आहे. राजकारणी म्हणून आव्हाड यांनी नीट विचार करून बोलले पाहिजे आणि कोणत्याही एका समाजाच्या बाजूने किंवा विरोधात बोलू नये. त्यांची विधाने, हावभाव आणि स्वर यामुळे हिंदू समाजाची प्रतिमा इतर समाजाच्या मनात डागाळली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
आव्हाड यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी करणारे पत्र मुंबई भाजपचे उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने झोन-10 चे पोलीस उपायुक्त महेश रेड्डी यांना दिले आहे. शिष्टमंडळात मुंबई भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना, भाजपचे उत्तर पश्चिम मुंबई सरचिटणीस मुरजी पटेल आणि माजी नगरसेवक पंकज यादव यांचा समावेश होता.