गांधीनगर : गुजरातमधील साबरमती कारागृहातून माफिया अतीक अहमदला पुन्हा एकदा प्रयागराजमध्ये आणण्यात आले आहे. त्यामुळे एन्काउंटरची भीती त्याला पुन्हा सतावू लागली आहे. उमेश पाल खून प्रकरणात अतीकला आरोपी ठरवण्यात आल्यानंतर त्याच्याविरुद्ध वॉरंट जारी करण्यात आले आहे. आता यूपी पोलिसांचे पथक साबरमती कारागृहात पोहोचले आणि अनेक तासांच्या प्रक्रियेनंतर अतिकसोबत प्रयागराजकडे निघाले आहे.
गेल्यावेळी अतीक अहमदला प्रयागराजकडे घेऊन जाताना व्हॅनला गाय आदळली होती. या धडकेत गाय ठार झाली आणि अतीक अहमदयांची व्हॅन पलटी होण्यापासून थोडक्यात बचावली.पोलीस पथकासह वाहनात चढल्यानंतर अतिक अहमदने पुन्हा एकदा मीडियासमोर आपली भीती व्यक्त केली. तो म्हणाला की, “त्यांचा हेतू योग्य नाही. त्यांना मला त्रास द्याचा आहे. मला मारायचे आहे. तसेच सुप्रीम कोर्टाने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मला हजर करा, असे सांगून ही मला का नेले जातेय. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ही होऊ शकते, असे ही अतीक म्हणाला.
दि.११ एप्रिल रोजी यूपी पोलिसांचे पथक अतिकसोबत सुमारे १३०० किलोमीटरच्या प्रवासाला निघाले. अतिक आधीच्या मार्गाने म्हणजे राजस्थानमधील उदयपूर, झाशीमार्गे मध्य प्रदेशातील शिवपूरमार्गे प्रयागराजला नेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळीही अतिकच्या सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
अतीक अहमदला प्रयागराजमध्ये आणल्याच्या बातम्यांदरम्यान #AtiqueAhmed आणि साबरमती जेल पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रेंडवर आहेत. यापूर्वी २६ मार्च २०२३ रोजी अतीक अहमदला साबरमती कारागृहातून प्रयागराजला आणले जात होते, तेव्हाही सोशल मीडियावर हा ट्रेंड आला होता.त्यावेळी नेटिझन्सनीही जोरदारपणे मीम्स शेअर केले.