मुंबई : "उद्धव ठाकरे यांच्या भोवतीच्या बडव्यांनीच त्यातही मिलिंद नार्वेकरांनीच अर्धी शिवसेना संपवली, कशी संपवली हे उद्धव यांना कळले सुद्धा नाही" अशा शब्दांत आरोप करत रामदास कदम यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि त्यांचे निकटवर्तीय यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवसेनेच्या आताच्या स्थितीला हेच उद्धव यांचे निकटवर्तीय त्यातही मिलिंद नार्वेकर हेच जास्त जबाबदार आहेत असा थेट आरोप रामदास कदम यांनी केला आहे.हे आरोप करताना देखील त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर कुठलेही आरोप करण्याचे टाळले.
शिवसेनेत नार्वेकरांनी एक पद्धत सुरु केली होती, त्यांना उद्धव ठाकरेंना थेट भेटलेले आवडायचे नाही. उद्धव ठाकरेंआधी नार्वेकरांना भेटयोला लागायचे, त्यांची इच्छा झाली कीच आपल्याला उद्धव यांची भेट मिळायची. हे अशा पद्धतीने झाले नाही की पुढच्या निवडणुकीत त्या व्यक्तीचे तिकीट कापले जायचे. सगळ्या शिवसैनिकांना म्हणजे आमदार, नगरसेवक, खासदार सगळ्यांना समान न्याय होता कोणीच यातून सुटले नव्हते. सगळ्या शिवसेनेत नार्वेकरांच्या समोर बोलायची कोणाची हिम्मत नव्हती कारण त्यांना उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा होता.
आज जर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत युतीच होऊ दिली नसती, त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर शिवसेनेचा मुख्यमंत्री झालाय हेच मान्य झाले नसते. आज ज्या शिवसैनिकांनी उठाव केला आहे त्यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन बोलले जात आहे, त्यांच्याबद्दल अत्यंत चुकीचे समाज पसरवले जात आहेत. त्यामुळे जनतेत संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून काही गोष्टींचा खुलासा होणे आवश्यक आहे असे कदम यांनी सांगितले.