नवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्ली येथील जहाँगीरपुरी परिसरात हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेवर धर्मांधांनी हल्ला केल्याची खळबळजनक घटना शनिवारी घडली. यामध्ये पोलिसांसह अनेक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. हा प्रकार जिहादी मानसिकतेच्या लोकांनी घडविला असून त्यांचा चोख बंदोबस्त करण्याची वेळ आल्याची प्रतिक्रिया विश्व हिंदू परिषदेतर्फे (विहिंप) व्यक्त करण्यात आली आहे. श्रीराम नवमी आणि हिंदू नववर्ष शोभायात्रांप्रमाणेच हनुमान जयंतीलाही धर्मांधांनी हल्ले केल्याने याबाबत सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
यापूर्वीही असे प्रकार
विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बंसल यांनी याबाबत दै. ‘मुंबई तरुण भारत’ला सांगितले की, “दिल्लीतील जहाँगीरपुरीमध्ये यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत. या परिसरात अनेक वर्षांपासून अशा समाजविघातक घटना घडत आलेल्या आहेत. विशिष्ट धर्मीयांचा परिसर म्हणून ओळख असलेल्या या परिसरात हिंदूंनी राहू नये, राहिल्यास आपला धर्म पाळू नये, असा स्पष्ट संदेश जिहादी मानसिकतेच्या लोकांकडून देशाचे शासन, प्रशासन आणि पोलीस आणि यंत्रणांना देण्यात येत आहे. असे वातावरण संपूर्ण देशभरात बनविण्यात येत आहे. असे प्रकार रोखण्यासाठी देशभरातील विशिष्ट धर्मीयांचे प्रार्थनास्थळ, मदरसे आणि जिहाद्यांच्या वस्त्यांमध्ये येथे नेमके काय चालते, याकडे यंत्रणांनी लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी या ठिकाणांमध्ये ‘सीसीटीव्ही’ लावण्यात यावेत आणि दोष आढळल्यास त्यांच्याविरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत (रासुका) कारवाई व्हावी, अशी विश्व हिंदू परिषदेची मागणी आहे,” असे ते म्हणाले.
जहाँगीरपुरी येथे हनुमान जयंतीनिमित्त शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये विहिंप कार्यकर्त्यांचाही सहभाग होता. शोभायात्रेसाठी पोलीस व संबंधित प्रशासनाची परवानगीही घेण्यात आली होती. त्याचप्रमाणे पोलीसदेखील शोभायात्रेमध्ये संरक्षणासाठी उपस्थित होते. शोभायात्रा अतिशय शांततेत जात असतानाच अचानक परिसरातील सभोवतालच्या घरांवरून दगडफेक होण्यास प्रारंभ झाला. त्यामुळे शोभायात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरू झाला. केवळ दगडफेकच नव्हे, तर लाठ्याकाठ्या आणि तलवारींचाही वापर करत शोभायात्रेत सहभागी असलेल्यांविरोधात हल्ले करण्यात आल्याचा आरोप होत आहे. शोभायात्रा उद्ध्वस्त करण्यासाठी यावेळी धर्मांधांनी जाळपोळीसह गोळीबारदेखील केल्याचे आरोप होत आहेत.