रत्नागिरी : पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडून राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासंदर्भात सकारात्मक भूमिका घेण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रिफायनरी समर्थकांना बळ प्राप्त झाले आहे. रिफायनरी प्रकल्पाला असलेले समर्थन शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी समन्वय समितीने ६ मार्च रोजी सर्वपक्षीय रिफायनरी समर्थन मेळाव्याचे आयोजन केले आहे. दुपारी तीन वाजता धोपेश्वरच्या यशोदिन गार्डन हॉल येथे हा मेळावा होणार आहे.
नाणार व त्या लगत असणाऱ्या गावात प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाची अधिसूचना शासनाने रद्द केल्यानंतर हा प्रकल्प राजापूर तालुक्याबाहेर जाता कामा नये, याकरिता तालुक्यातून सतत उठाव सुरू झाले आहेत. अशातच शहरालगतच्या धोपेश्वर बारसू परिसरात शून्य विस्थापनामुळे रिफायनरी प्रकल्प हलविण्याच्या हालचाली सुरू आहेत. तालुक्यातून रिफायनरी प्रकल्पाला मोठे समर्थन मिळत असताना काही दिवसांपूर्वी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी रिफायनरी प्रकल्पाबाबत सकारात्मक भूमिका घेतली होती.
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी रिफायनरी प्रकल्पाच्या जागेची पाहणी होण्याबाबत संकेत दिले होते. या घडामोडींमुळे राजापूर तालुक्यातील रिफायनरी समर्थकांना बळ प्राप्त झाले असून आता अधिक जोमाने रिफायनरी प्रकल्पाला असलेले समर्थन शासनापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार समर्थकांनी केला आहे. याचाच एक भाग म्हणून या समर्थन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला तालुकावासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.