मुंबई : अभिनेता स्वप्नील जोशीने 'समांतर २'चा टीझर नुकताच सोशल मिडीयावर प्रदर्शित केला. 'एमएक्स प्लेयर'वर प्रदर्शित झालेल्या 'समांतर'च्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या वेब्सिरीजचा दुसरा भाग कधी येणार याचीच चर्चा गेले काही दिवस होती. स्वप्नीलने याचा टीझर प्रदर्शित करून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. येत्या २१ जूनला या वेबसिरीजचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.
अभिनेता स्वप्नील जोशी आणि तेजस्विनी पंडित यांची ‘समांतर’ ही वेबसिरीज २०२०मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. स्वप्नील आणि तेजस्विनीसोबत अभिनेता नितीश भारद्वाजसुद्धा यामध्ये मुख्य भूमिकेत होते. सतीश राजवाडे यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. काही दिवसांपूर्वी स्वप्नीलचा एक व्हिडीओसुद्धा जोरदार व्हायरल झाला होता. यामध्ये तो ‘समांतर २’चे डबिंग करताना दिसून आला होता. त्यामुळे भाग २ लवकरच येणार असल्याचे म्हटले जात होते.