अहमदाबाद : भारत-इंग्लंड यांच्यात होणाऱ्या पाच दिवसीय टी-२० क्रिकेट सामन्यांच्या मालिकेसाठी ५० टक्के प्रेक्षकांची मर्यादा घालण्यात आली आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशनतर्फे ही माहिती देण्यात आली. कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यात सांगण्यात आले आहे. १ लाख ३२ हजार क्षमता असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर ६६ हजार प्रेक्षकांची उपस्थिती असणार आहे.
कसोटी मालिकेसाठी सुध्दा हीच नियमावली जाहीर करण्यात आली होती. पाचही सामने नरेंद्र मोदी स्टेडिअम खेळवले जाणार आहेत. गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, सरकारच्या एसओपी नियमांचे पालन केले जाणार आहे. जीसीएचे उपाध्यक्ष धनराज नथवानी म्हणाले की, केवळ ५० टक्के तिकीट ऑनलाईन माध्यमातून उपलब्ध असणार आहेत. संपूर्ण मैदानाचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. कोरोनाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करू, अशी हमी यावेळी देण्यात आली आहे.
पुण्यातील सामन्यात प्रेक्षकांना मिळणार नाही प्रवेश
भारत आणि इंग्लडमध्ये होणाऱ्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना १४ मार्च, तिसरा सामना १६ मार्च, चौथा सामना १८ मार्च आणि पाचवा सामना २० मार्च रोजी खेळवला जाणार आहे. यापूर्वी महाराष्ट्र सरकारने २३ मार्च रोजी सुरू होणाऱ्या भारत-इंग्लड एकदिवसीय सामन्यातील मालिकेत प्रेक्षकांच्या उपस्थितीवर निर्बंध लावले आहेत. सर्वात जास्त कोरोनाचा प्रभाव असलेल्या राज्यांपैकी महाराष्ट्र अग्रेसर आहे. दिवस-रात्र खेळवल्या जाणाऱ्या या सामन्यातील तिन्ही सामने पुण्यात खेळवले जाणार आहेत.