
नाशिक : अनिश्चितेच्या भोवऱ्यात सातत्याने सापडलेल्या 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाची मुहूर्तघटिका अखेर आयोजकांना सापडली आहे. साहित्य संमेलन आयोजनाच्या नव्या तारखा आणि नवे ठिकाण अखेर स्वागताध्यक्ष व जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली आयोजकांनी सोमवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेत जाहीर केले. हे संमेलन कोरोना संसर्गामुळे लांबणीवर टाकण्यात आले होते. आता कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने संमेलन आयोजित करण्याचे निश्चित झाले आहे. त्यानुसार, येत्या दि. ३, ४ आणि ५ डिसेंबर रोजी नाशिकमध्ये साहित्य संमेलन होणार आहे.
संमेलनाचे ठिकाणही बदलण्यात आले आहे. हे संमेलन कॉलेज रोडवरील ‘गोखले एज्युकेशन सोसायटी’च्या आवारात होणार होते. मात्र, आता हे संमेलन आडगाव येथील ‘भुजबळ नॉलेज सिटी’ येथे होणार आहे. यावेळी पत्रकार परिषदेस साहित्य संमेलनाचे आयोजक असलेल्या ‘लोकहितवादी मंडळा’चे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, ‘सावाना’चे संजय करंजकर आणि यांसह संमेलनाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी जातेगावकर यांनी सांगितले की, “साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत नारळीकर व साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्याशी नाशिक येथील प्रस्तावित साहित्य संमेलनाबाबत चर्चा झाली. त्यानुसार येत्या दि. ३, ४ आणि ५ डिसेंबर रोजी नाशिक येथे संमेलन होणार आहे. यावेळी भुजबळ यांनी साहित्य संमेलनाच्या आयोजनाच्या जागेबाबत आपल्याला कोणतीही समस्या नसल्याची स्पष्टोक्ती दिली. ”साहित्य संमेलन आयोजनाच्या जागेबाबत विस्तृत माहिती देताना जातेगावकर म्हणाले की, “ ‘गोखले एज्युकेशन सोसायटी’चे संपूर्ण सहकार्य लाभले होते. मात्र, वाहनतळ व्यवस्था आणि होणारी संभाव्य वाहतूककोंडी लक्षात घेता. हे संमेलन ‘भुजबळ नॉलेज सिटी’ येथे आयोजित करण्यात येणार आहे. ‘भुजबळ नॉलेज सिटी’ येथे असणार्या विविध सुविधा, मंडप उभारणीसाठी लागणारा कमी कालावधी, समाज कल्याण विभागाचे जवळच असणारे वसतिगृह, वाहनतळ व्यवस्था, संवाद, परिसंवाद, बाल साहित्य मेळावा आदींच्या आयोजनासाठी आवश्यक असणार्या सुविधा यांची पूर्तता ‘भुजबळ नॉलेज सिटी’ येथे उत्तम आहे,” असे जातेगावकर यांनी यावेळी सांगितले. तसेच, नाशिक शहरात संमेलन आयोजित केल्यास शहरात वाहतूककोंडी होण्याचीदेखील दाट शक्यता आहे. त्यामुळे शहराबाहेर साहित्यसंमेलन आयोजित करणे सोयीचे असल्याचे यावेळी जातेगावकर म्हणाले. साहित्य संमेलन स्थळी नागरिकांना येता यावे, यासाठी ‘संदीप फाऊंडेशन’, ‘मविप्र संस्था’, ‘सिटीलिंक’ बसेस याद्वारे बसची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सूतोवाच यावेळी जातेगावकर यांनी केले.
दि. ३ डिसेंबर रोजी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानापासून ग्रंथदिंडी निघणार असून ती दिंडी शहरातील काही भागातून नेण्यात येणार आहे. नंतर ती दिंडी बसद्वारे संमेलनस्थळी पोहोचणार असल्याचे जातेगावकर यांनी यावेळी सांगितले. साहित्य संमेलनाचे उद्घाटन हे साहित्यिकांच्याच हस्ते होणार असल्याचे सांगत उद्घाटकांचे नाव लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे जातेगावकर यांनी यावेळी सांगितले. तसेच समारोपासदेखील साहित्यिकांनाच आमंत्रित करण्यात येणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. कोरोनाचे सर्व शासकीय निर्बंधांचे पालन करून संमलेन पार पडणार असल्याचे भुजबळ यांनी यावेळी स्पष्ट केले.