"राष्ट्र मंदिराचा पाया हा घरातच"- पद्मश्री डॉ. निवेदिता भिडे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Oct-2020
Total Views |

Dr Nivedita Bhide_1 
 
मुंबई / पुणे : ‘‘स्त्री ही जगज्जननी आणि मातृस्वरूप आहे. ती कुटुंबाचा आधार आहे. त्यामुळे राष्ट्र मंदिराचा पाया हा घरातच आहे. हा पाया मजबूत करण्यासाठी आपल्या देशातील कुटुंबव्यवस्था राष्ट्राच्या कार्यासाठी अनुरूप करावी लागेल" असे प्रतिपादन कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद केंद्राच्या उपाध्यक्षा पद्मश्री डॉ. निवेदिता भिडे यांनी केले. सा. विवेकच्या ‘राममंदिर ते राष्ट्र मंदिर’ ग्रंथानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रजागरण व्याख्यानमालेचे ऑनलाइन सातवे पुष्प शनिवार, दि. ३ ऑक्टोबर २०२० रोजी सायंकाळी सहा वाजता पार पडले. ‘रचनात्मक कार्यातील महिलाशक्ती’ या विषयावर डॉ. निवेदिता भिडे यांनी विचार प्रकट केले.
 
'राष्ट्र' या संकल्पनेविषयी बोलताना डॉ. भिडे म्हणाल्या, ‘‘आपण नव्याने राष्ट्र घडवत नाही. हे राष्ट्र अनादिकाळापासून अस्तित्वात आहे. पण या राष्ट्रावर परकीय आक्रमणे आली, नंतर ब्रिटिशांचे राज्य होते. त्यामुळे या राष्ट्रातील कुटुंबव्यवस्था, ग्रामव्यवस्था, शिक्षणव्यवस्था, अर्थव्यवस्था कोलमडल्या. त्यामुळे या राष्ट्राचे पुनरुत्थान होणे गरजेचे आहे. राष्ट्र मंदिराच्या उभारणीत प्रत्येकाचे दायित्व असणे आवश्यक आहे. हे मंदिर परमवैभवशाली असणार आहे. परमवैभवाचा अर्थ संपत्तीशी सीमित नाही. हे मंदिर प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असेल. इथे अस्मितेवर, विविधतेवर आधारलेला समाज असेल आणि याला जोडणारे एकात्मतेचे दर्शन असेल. जीवनमूल्ये, अस्मिता, राष्ट्राचा इतिहास, राष्ट्रपुरुष हे सगळ्याचे समान असतील, अशी राष्ट्र मंदिराची उभारणी असेल.’’
 
भारतीय महिलेचे स्थान, महत्त्व आणि गुणवैशिष्ट्ये याविषयी डॉ. निवेदिता भिडे यांनी आपल्या व्याख्यानातून अभ्यासपूर्ण भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, ‘‘धर्म हा राष्ट्राचा प्राण आहे. स्त्री आणि पुरुष हे आपल्या धर्माचे पालन करणारे दोन घटक आहेत. या दोघांना कुटुंब, समाज, परिवार यांच्या आणि विश्वाच्या कल्याणासाठी योगदान द्यायचे आहे, हे विसरता कामा नये आणि हेच त्यांचे राष्ट्राविषयी कर्तव्य असले पाहिजे.’’ राष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी स्त्रियांमध्ये कोणत्या गुणांची आवश्यकता असते, या संदर्भात बोलताना त्या म्हणाल्या, "महिलांमध्ये मोठी कार्यशक्ती असते. राष्ट्रउभारणीसाठी संवेदनशीलता, समर्पण, धैर्य आणि क्षमा या गुणांची आवश्यकता असते. महिलांमध्ये या सर्व गुणांचा समावेश आहे, म्हणूनच राष्ट्र मंदिराच्या उभारणीत तिचा सहभाग महत्त्वाचा आहे.
 
आजच्या काळात महिला विविध क्षेत्रांत अग्रेसर आहेत ही एक चांगली गोष्ट आहे. आता सेवा कार्यामध्ये महिला पुढे येताना दिसतात. प्रत्येक क्षेत्रामध्ये तिच्या या गुणांचा राष्ट्र मंदिराच्या उभारणीत उपयोग होणार आहे. जी मुले राष्ट्रकार्यासाठी पुढे येत आहेत, अशा प्रत्येक मुलांच्या आईने त्यास प्रोत्साहन द्यावे" असेही त्या शेवटी म्हणाल्या. रविवार दि. ४ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी दहा वाजता विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे 'रामजन्मभूमी : संघर्ष आणि संकल्पपूर्ती' या विषयावरील व्याख्यानाने व्याख्यानमालेचा समारोप होणार आहे. हे व्याख्यान सा. विवेकच्या फेसबुक पेजवरून व यूट्यूब चॅनलच्या https://www.facebook.com/VivekSaptahik/live https://youtu.be/GvbItWSUBNY या लिंकवरून पाहता येणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@