पिकांची नुकसानभरपाई मिळावी यासाठी २०१९-२० खरीप हंगामासाठी पंतप्रधान पीक विमा योजना लागू करण्यात आली होती. या योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत २४ जुलैपर्यंतच होती. मात्र अनेक शेतकऱ्यांनी अद्याप पीक विमा योजनेत नोंदणी केलेली नाही. त्यामुळे हे शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहण्याची शक्यता होती. त्यामुळे या योजनेस ५ दिवसांची म्हणजेच २९ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या अवर सचिव नीता शिंदे यांनी राज्यपाल यांच्या आदेशान्वये हे परिपत्रक जारी केले आहे.
पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे विमा अर्ज बँक आणि ‘आपले सरकार सेवा केंद्र` (डिजीटल सेवा केंद्र) येथे स्वीकारण्यात येत आहेत. तरी शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत पीक विमा संरक्षण मिळण्यासाठी विहित मुदतीपुर्वी नजिकची बँक आणि आपले सरकार सेवा केंद्रावर विमा हप्त्यासह आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करावा. याबाबत अधिक माहितीसाठी विभागीय कृषि सह संचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाशी तसेच यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषिमंत्र्यांनी केले आहे.