इस्लामाबाद : पाकिस्तानच्या विशेष न्यायालयाने माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना देशद्रोह प्रकरणी मृत्यूदंडाची शिक्षा शिक्षा सुनावली आहे. सोमवारी लाहोर उच्च न्यायालयाने सरकारला नोटिस पाठवली होती. उच्च न्यायालयात मुशर्रफ यांनी त्यांची याचिका दाखल केल्यानंतर त्यांच्याविरुद्धचा खटला आणि इतर कारवाई असवैधानिक असल्याचे जाहीर करावे अशी मागणी केली होती. त्यावर इस्लामाबादच्या विशेष न्यायालायत झालेल्या सुनावणीत न्यायालयाने हा निर्णय देण्यात आला.
देशद्रोहाचा खटल्याचा निर्णय तीन सदस्यीय विशेष न्यायालयात देण्यात आला. उच्च न्यायालयाने याआधी विशेष न्यायालयाला निर्णय देण्यापासून थांबवण्याचे आदेश दिले होते. हा निर्णय गेल्या महिन्यात राखून ठेवला होता. मुशर्रफ गेल्या दोन वर्षांपासून दुबईत वास्तव्य करत आहे. त्यांच्यावर संविधानाचा भंग आणि ३ नोव्हेंबर २००७मध्ये आणीबाणी लागू केल्याप्रकरणी देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला होता. २०१३ पासून त्यांच्यावरील खटल्याची सुनावणी प्रलंबित होती. त्यानंतर मुशर्रफ यांनी प्रकृतीचे कारण देत मार्च २०१६मध्ये दुबईला पळ काढला होता. तब्येतीचे कारण देत त्यांनी पाकिस्तानात परतण्यासही नकार दिला होता. कोर्टाने त्यांना वारंवार समन्स बजावूनही ते सुनावणीला गैरहजर राहिले. त्यामुळे त्यांना फरार घोषित करण्यात आले होते.