अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प, ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे ते रशियातील स्थानिक राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांनाच या खड्ड्यांनी त्रस्त केल्याचे वारंवार समोर येते. जागतिक रोग असलेल्या खड्ड्यांवर औषध नाही का, हा सर्वसामान्यांना पडलेला मोठा प्रश्न पण, त्यावर औषध आहे. नेदरलँड व जर्मनीसारख्या काही देशांनी ते असल्याचे सिद्ध केले आहे.
स्त्यांवर असणारे खड्डे म्हणजे आपल्या संभाषणाचा विषय आणि शासनाच्या कामकाजाचा आढावा घेणारे मापक झाले आहे. रस्त्यांतील खड्ड्यांमुळे होणारे अपघात हे दहशतवादी हल्ल्यांपेक्षा जास्त आहेत, अशी चर्चा मध्यंतरीच्या काळात बरीच चर्चिली गेली. पण, केवळ भारतच खड्ड्यांनी ग्रासलेला नसून जगातील इतर देशांतही खड्ड्यांचे प्रमाण मोठे आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प, ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे ते रशियातील स्थानिक राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांनाच या खड्ड्यांनी त्रस्त केल्याचे वारंवार समोर येते. जागतिक रोग असलेल्या खड्ड्यांवर औषध नाही का, हा सर्वसामान्यांना पडलेला मोठा प्रश्न पण, त्यावर औषध आहे. नेदरलँड व जर्मनीसारख्या काही देशांनी ते असल्याचे सिद्ध केले आहे. जगाच्या पाठीवर नेमके कुठे खड्डे आहेत आणि त्यावर त्यांनी काय उपाययोजना केल्या, यांचा संक्षिप्त आढावा घेऊया.
नेदरलँड आणि जर्मनी
नेदरलँडमधील रस्ते हे जगातील सर्वात चांगले रस्ते असल्याचे मानले जाते. २०१० मध्ये येथील प्रशासनाने पावसाचे पाणी शोषणारे तंत्रज्ञान रस्तेबांधणीच्या साहित्यात वापरले. त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यांवर साचण्यास प्रतिबंध निर्माण झाला. या यशस्वी प्रयोगानंतर गेल्या आठ वर्षांत त्यांनी हे तंत्रज्ञान देशभर राबविले व आपले रस्ते जगातील सर्वात सुंदर असण्याचा दावा करण्यास सुरुवात केली. जर्मनीनेदेखील याच प्रकारचे तंत्रज्ञान वापरून आपले राष्ट्र खड्डेमुक्त करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या यशस्वी प्रयोगाची दखल महासत्तेने घेतली आणि आपल्या राष्ट्रातदेखील हेच तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात केली.
अमेरिका
जागतिक स्तरावर आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि संरक्षणदृष्ट्या आपला अंमल प्रस्थापित करण्यात धन्यता मानणाऱ्या तथाकथित महासत्तेलाही खड्डेरोगाने जर्जर करून सोडले आहे. महासत्तेचा सत्ताधीश होणाऱ्या ट्रम्प यांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा मुद्दादेखील खड्डाच होता. यावरून आपल्याला तेथील खड्ड्यांची भीषणता दिसून येते. अमेरिकेत रस्त्यांवरील खड्डेदुरुस्तीसाठी वार्षिक ६८ अब्ज डॉलर्स खर्च केले जातात. तरीही तेथील बहुतांश शहरांतील रस्ते खडबडीत आणि अपघातप्रवण आहेत. तीन वर्षांपूर्वीच्या एका रस्ता पाहणी अहवालानुसार लॉस एंजेलिस शहर ६० टक्के खड्ड्यांनी वेढलेले आहे. आता जरी त्यात सुधारणा झाली असली तरी, शहर खड्डेमुक्त केल्याचे सांगण्यास कोणीही धजावत नाही. तेथील प्रशासनाने पुढील पन्नास वर्षांत ‘खड्डेमुक्त अमेरिका’ करण्याचा संकल्प सोडला असून त्यापोटी प्रत्येक वाहनचालकाला किमान ३२०० डॉलर्सचा आर्थिक भार सोसावा लागणार आहे.
ब्रिटन
‘ब्रेक्झिट’च्या तणावाहूनही अधिक ब्रिटनच्या पंतप्रधानांना मध्यंतरीच्या कालखंडात खड्ड्यांच्या मुद्द्याने चिंताग्रस्त केले होते. बारमाही पाऊस असल्याने मार्च ते मे या कालावधीत येथे सर्वाधिक खड्डे तयार होत असतात. दरवर्षी त्यावर जनमानस आपला प्रक्षोभ जाहीर करत असतो. आपल्यासारखीच हटके आंदोलने तेथेही केली जातात. स्वाक्षरी मोहीम राबविली जाते. (शेवटी त्यांचीच शिकवण आपणास आहे, नाही का?) वाढणाऱ्या तक्रारी लक्षात घेता थेरेसा मे यांना तब्बल चार हजार खड्डे बुजवण्याची घोषणा करावी लागली. मात्र, आपल्याकडून दिवसाला एका शहरातून हजारो तक्रारी केल्या गेल्या, तरी स्थितप्रज्ञतेची सीमा गाठणाऱ्या प्रशासनाची साधना आणि मौनव्रत यात काही फरक पडत नाही, हीच बाब मुळी चिंतनीय आहे.
कॅनडा
भारत आणि कॅनडा यांची फारशी कोणत्या खेळात स्पर्धा नसते. पण, आजमितीस कॅनडातील रस्ते भारतीय खड्ड्यांशी स्पर्धा करण्यासाठी सज्ज आहेत. एप्रिल हा महिना या देशात खड्ड्यांचा महिना म्हणून ओळखला जातो. एकट्या व्हँकूअर शहरात ४६ हजार खड्डे असून तेथील वृत्तपत्रीय बातम्यांनुसार प्रशासनासमोर तब्बल १२ लाख खड्डे बुजविण्याचे आव्हान आहे.
किमान इतर राष्ट्रे खड्ड्यांच्या समस्येची एक राष्ट्रीय समस्या म्हणून दखल घेतात. त्यावर उपाय योजतात. मात्र, आपण केवळ दावे करतो आणि कधीतरी आमच्या अधिपत्याखालील रस्त्यांवर खड्डे नाहीत, असे मुजोर उत्तर देत जबाबदारी ढकलण्यात धन्यता मानतो.
- प्रवर देशपांडे