नाशिक : महापालिकेने २००७ मध्ये केलेल्या वृक्षगणनेत १९ लाख वृक्ष शहरात आढळून आले होते. त्यानंतर २०१६ पासून सुरू असलेल्या गणनेत तब्बल ४७ लाख ९५ हजार ३८७ इतके वृक्ष आढळून आले आहेत. म्हणजेच या दहा वर्षांच्या काळात तब्बल २८ लाख ९५ हजार ३८७ इतक्या वृक्षांची संख्या वाढल्याची सुखद बाब पुढे आली आहे. पोलीस अकादमी आणि महापालिकेच्या हद्दीतील लष्करी छावणीत सर्वेक्षण करण्यास संबंधित यंत्रणांनी हरकत घेतली आहे. त्यामुळे यंदाची वृक्षगणना ९९ टक्क्यांवर अडकून बसली आहे. म्हणजे ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. यंदाची गणना ही जीपीएस कार्यप्रणालीद्वारे पूर्ण करण्यात आली आहे.
महापालिकेत गेल्या काही वर्षांपासून वृक्षगणना न झाल्याने गेल्या पंचवार्षिक काळात वृक्ष प्राधिकरण समिती गठीत होऊ शकली नव्हती. याबाबत जनहित याचिका दाखल झाल्यानंतर उच्च न्यायालयाने काही निर्देश महापालिका प्रशासनाला दिले. त्यानंतर नोव्हेंबर २०१६ पासून वृक्षगणना सुरू झाली. प्रारंभी २० डिसेंबर २०१७ डिसेंबर महिन्यापर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर या कामास फेब्रुवारी २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्याची फलश्रुती आता समोर आली आहे.
पंचवटी आघाडीवर
सर्वाधिक वृक्ष पंचवटी विभागात आढळून आले आहेत. एकूण वृक्षसंख्येच्या तुलनेत ही संख्या ३७ टक्के म्हणजे १७ लाख, ५२ हजार, १७७ इतकी आहे. त्या खालोखाल सिडको विभागात १५ लाख, ८५ हजार, ६१८ (३३ टक्के) इतके वृक्ष आहेत. शहरात सर्वाधिक प्रदूषण असलेल्या नाशिक पश्चिम व नाशिक पूर्व विभागात वृक्षांचे प्रमाण अवघे एक टक्का इतकेच असल्याची बाब या गणनेतून पुढे आली आहे. त्यामुळे यापुढील काळात या दोन विभागांत वृक्ष लागवड आणि संवर्धनाचा मोठा कार्यक्रम प्रशासनाला हाती घ्यावा लागणार आहे. नाशिक रोडच्या प्रभाग १९ मध्ये ५ लाख, ६५ हजार ३६१ झाडे आढळली. इतर प्रभागांच्या तुलनेत ही संख्या सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ प्रभाग एकमध्ये ४ लाख, ९४ हजार, ३२५ झाडे आहेत. ज्या भागातील झाडांची गणना झाली आहे, त्यात पाच ते दहा वर्षे वय असलेल्या झाडांची संख्या ३ लाख ९८ हजार १७७ आहे.
रुद्राक्षासह दुर्मीळ प्रजातींचे तब्बल ७० वृक्ष
२००७ मध्ये झालेल्या वृक्षगणनेत ५७ प्रकारची दुर्मीळ झाडे होती. यंदाच्या गणनेत तब्बल २५६ प्रकारच्या प्रजाती नाशिक शहरात आढळून आल्या आहेत. त्यातील ७० वृक्षांच्या प्रजाती या दुर्मीळ आहेत. म्हणजेच आधीच्या गणनेच्या तुलनेत यंदा दुर्मीळ प्रजातींमध्ये १३ वृक्ष प्रजाती वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. यात रुद्राक्ष, महारूख, माकड लिंबू, दांडुस, शेंद्री, वारस, मुचकुंद, सुरंगी, साई-आवळा, रबर ट्री राई-आवळा, नागकेसर, लिची, शमी, कावस, व्हाइट बॉटल ब्रश, गेला, भद्राक्ष, धत्रीफल, पिपली, बुरलीवड, कदंब, लोखंडी, उंडी, रानचिकू, करमाळ आदींचा अंतर्भाव आहे.
आधुनिक यंत्रणा कार्यरत
जीआयएस व जीपीएस यंत्रणेद्वारे ही वृक्षगणना केली जात असून, गुगल मॅपवर आपल्या भागातील वृक्ष आता नागरिकांना पाहता येणार आहेत. वृक्षगणनेची माहिती नागरिकांसाठी ऑनलाईन स्वरूपात मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. गणना करताना वृक्षांची माहिती अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल अॅपद्वारे डिजिटलाइझ करण्यात आली असून, सर्व वृक्षांची माहिती जिओ रेफरन्स पद्धतीने नकाशावर उपलब्ध आहे.