निपाह विषाणू आजाराचा एकही रुग्ण महाराष्ट्रात नाही- डॉ. दीपक सावंत

    23-May-2018
Total Views | 31
 
 
 
 
 
मुंबई : केरळमध्ये उद्भवलेल्या निपाह विषाणुच्या आजारासारखा एकही रुग्ण महाराष्ट्रात आढळलेला नाही. याबाबत घाबरण्यासारखी कोणतीही परिस्थिती राज्यात नाही, पण तरीही या आजारासंदर्भातील काही लक्षणे आढळल्यास रुग्णांनी डॉक्टरांशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले आहे. राज्यात या आजाराचा एकही रुग्ण नसला तरी खबरदारीचे उपाय म्हणून सर्व शासकीय तसेच खासगी रुग्णालयांना सूचीत करण्यात आले आहे. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयासह राज्यातील प्रमुख शासकीय रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्ष सुरु करण्याबाबत सूचीत करण्यात आले आहे, अशी माहिती मंत्री डॉ. सावंत यांनी आज मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
 
 
मंत्रालयात आज मंत्री डॉ. सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत यासंदर्भात उच्चस्तरीय बैठक झाली, त्यात या आजारासंदर्भात घ्यावयाच्या खबरदारीच्या उपाययोजना निश्चित करण्यात आल्या, त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. सावंत बोलत होते. बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त डॉ. संजिवकुमार, आरोग्य संचालक डॉ. संजीव कांबळे, संसर्गजन्य रोग प्रतिबंधक समितीचे सदस्य डॉ. ओम श्रीवास्तव, अतिरिक्त अभियान संचालक डॉ. सतिश पवार आदी उपस्थित होते.
 
 
डॉ. सावंत म्हणाले की, रुग्णालये, डॉक्टर तसेच नर्सेस यांनी या आजारासंदर्भात घ्यावयाची काळजी आणि करावयाच्या उपाययोजना यासंदर्भातील मार्गदर्शिका राज्यातील सर्व रुग्णालयांना पाठविण्यात येत आहे. निपा विषाणू आजारात विशेषत: ताप, अंगदुखी, डोकेकुखी, झोपाळलेपणा, मानसिक गोंधळ उडणे, बेशुद्ध पडणे अशी लक्षणे आढळतात. विशेषत: केरळ भागातून प्रवास करुन आलेल्या व्यक्तिंमध्ये अशी लक्षणे आढळल्यास त्याबाबत तातडीने दखल घेण्यात यावी. अशा रुग्णांनी तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल व्हावे. खासगी रुग्णालयातही अशा लक्षणांचे रुग्ण आढळल्यास त्याबाबत तातडीने सरकारी रुग्णालयास सूचीत करण्यात यावे व सरकारी रुग्णालयात यासाठी सुरु असलेल्या विलगीकरण कक्षात या रुग्णांना दाखल करण्यात यावे, असे आवाहन त्यांनी केले.
 
 
राज्यात या रोगासंदर्भात एकही रुग्ण आढळलेला नाही. पण तरीही खबरदारीच्या उपाययोजना म्हणून राज्यातील सर्व खासगी आणि शासकीय रुग्णालये, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा शल्यचिकित्सक यांना सूचीत करण्यात आले आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. लोकांनीही खबरदारीचा उपाय म्हणून या विषाणुचा प्रादुर्भाव झालेल्या केरळमधील कोझीकोडे व इतर परिसरातील प्रवास टाळावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
 
 
निपाह विषाणूचा प्रसार –
 
या विषाणुचा प्रसार मुख्यत्वे फळांवर जगणाऱ्या वटवाघळांमार्फत होतो. वटवाघळांनी अर्धवट खाल्लेली फळे हाताळल्याने अथवा खाल्ल्याने हा आजार होतो. डुक्कर आणि इतर पाळीव प्राणी यांना देखील याची बाधा होऊ शकते. निपाह विषाणुची लागण माणसापासून माणसास होऊ शकते. रुग्णांवर उपचार करणारे वैद्यकीय कर्मचारी, रुग्णसेवा करणारे नातेवाईक यांना लागण होऊ शकते. त्यामुळे अशा रुग्णास विशेष विलगीकरण कक्षात ठेवणे आवश्यक असते. 
 
प्रतिबंधात्मक खबरदारी –
 
डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्ण उपचार आणि शुश्रूषा करताना जागतिक आरोग्य संघटनेच्या universal precautions नुसार आवश्यक खबरदारी घ्यावी. शेतात, जंगलात अथवा इतरत्र पडलेली फळे खाणे टाळावे. निपाह विषाणु आजाराच्या रुग्णास विशेष विलगीकरण कक्षात ठेवण्यात यावे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
काँग्रेसमधल्या

काँग्रेसमधल्या 'या' बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, महत्त्वाच्या पदावर पाणी सोडलं! सांगितलं 'हे' कारण...

(Anand Sharma Resigns As Chairman Of Congress Foreign Affairs Department) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी रविवारी दि. १० ऑगस्ट रोजी पक्षाच्या परराष्ट्र व्यवहार विभागाच्या (DFC) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आनंद शर्मा यांनी पक्षाची पुनर्रचना व्हावी आणि या पदावर तरुण नेत्याची निवड व्हावी, त्यासाठी आपण हे पद सोडत असल्याचे म्हटले आहे. माजी केंद्रीय मंत्री राहिलेले शर्मा प्रदीर्घ काळापासून या पदावर कार्यरत होते. मात्र आता त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता काँग्रेसला मोठा धक्का ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121