जळगाव :
सडक सुरक्षा-जीवन रक्षा हे ब्रीदवाक्य घेऊन वाहन चालविताना घ्यावयाची काळजी, वाहतुकीच्या नियमांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी. याकरिता जळगाव जिल्हा पोलीस दल, वाहतूक शाखा व उप प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात २३ एप्रिल ते ७ मे या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे.
या अभियानाच्या निमित्ताने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यावतीने आपत्ती व्यवस्थापन अधिकारी एन. पी. रावल यांनी अपघाताची कारणे, त्यावरील उपाययोजना त्याचबरोबर वाहन चालविताना काय करावे व काय करु नये याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी याकरिता काही सूचना केल्या आहेत. दिवसेंदिवस अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेता नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
अपघात कारणे आणि उपाययोजना अपघाताची कारणे
मानवी चुका :
१. अतिवेगाची नशा., २. धोकादायक ओव्हरटेकिंग/लेन कटिंग. ३. मद्यपान करून गाडी चालविणे., ४. गाडीत अनेक प्रवासी कोंबणे वा क्षमतेपेक्षा अधिक वजन वाहून नेणे., ५. गाडी चालविण्याचे नीट प्रशिक्षण न घेणे वा वाहतूक नियमांचे अपुरे ज्ञान., ६. चालकांवरील अतिताण, थकवा., ७. कुठेही गाडी उभी करणे., ८. हेल्मेट, सीट बेल्ट न वापरणे.
हवामान : १. धुके किंवा मुसळधार पाऊस., २. प्रचंड उष्णता निर्माण झाल्याने टायर फुटणे.
इतर : १. जनावर रस्त्यात आडवे येणे., २. पादचार्यांची चूक., ३. दरड कोसळणे., ४. वाहतुकीची कोंडी.
हे करा : १. लेनची शिस्त नेहमी पाळा., २. आखून दिलेली वेगमर्यादा पाळा., ३. महामार्गावर मदतीसाठी उभ्या असलेल्या वाहनाची मदत करा., ४. नेहमी सीट बेल्ट वापरा. त्यात कमीपणा मानू नका., ५. गाडी चालविताना नेहमी सतर्क राहा., ६. रात्रीच्या वेळी गाडी चालविताना पुढील व मागील दिवे, पार्किंग लाइट सुरू आहेत का याची तपासणी करा., ७. वाहतूक नियम पाळा.
हे करू नका : १. मद्यपान करून गाडी चालवू नका., २. धोकादायक पद्धतीने ओव्हरटेक करू नका.
३. कुठेही गाडी उभी करू नका., गाडीच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरू नका.
ओव्हरटेक करताना
- डाव्या बाजूने ओव्हरटेक करणे टाळा.
- काही गाडी चालक त्यांच्या गाडीचा उजवीकडील ब्लिंकर अनवधानाने सुरू ठेवतात की, जेणेकरून तुम्हाला ओव्हरटेक करणे - सोपे आहे असे वाटावे; परंतु त्यावर विश्वास ठेवणे हे अपघाताला आमंत्रण असते. तुम्ही स्वत:च ओव्हरटेकबाबतचा निर्णय घेतला पाहिजे.
- एकावेळी एकपेक्षा अधिक वाहनांना ओव्हरटेक करू नका. त्यामुळे तुम्हाला तुमच्या लेनमध्ये पुन्हा येणे शक्य होत नाही.
- ओव्हरटेक करताना तुमच्या उजवीकडील आरशात पाहणे आवश्यक आहे. बर्याचवेळा आणखी एक गाडी तुम्हाला ओव्हरटेक करू इच्छित असेल.
- आत्मविश्वास नसेल तर ओव्हरटेक करू नका.
- आपल्या पुढे ओव्हरटेक करीत असलेल्या वाहनासोबत समांतर ओव्हरटेक करू नका. अपघाताचे हे एक कारण आहे.
- पुढील वाहनापासून सुरक्षित अंतर ठेवा.
- वेग नियंत्रणात ठेवा. अधिक वेग म्हणजे गाडी तात्काळ थांबविण्यासाठी अधिक काळजी व परिश्रम आवश्यक.
- अवजड वाहनांच्या मागे राहून गाडी चालवू नका. ट्रकसारख्या वाहनांना मागचे दिसत नसते. त्यामुळे तुमची गाडी मागे आहे याची त्याला माहिती होत नाही आणि त्यामुळे तो सुरक्षेची काळजी घेईल अशी अपेक्षा नसते.
- महामार्गावर गाडी चालविताना तिची तांत्रिक स्थिती दर्जेदार हवी. ब्रेक्स हे महत्त्वाचे असून कधी अचानक गाडी थांबवावी लागेल, याचा भरवसा नसतो.
- आपल्यावर वेगाची मर्यादा घाला.
- जी गाडी हाताळलेली नाही, त्याची नीट माहिती करून घ्या आणि मगच चालवा.
- गाडीच्या वैशिष्टयांविषयी माहिती करून घ्या. उदा. गाडीचा वेग वाढण्याची मर्यादा, तिची रस्ता धरून राहण्याची क्षमता, स्टिअरिंगची संवेदनक्षमता, ब्रेक्सची स्थिती आदी.
- महामार्गावर गाडी चालविताना गाण्यांचा आवाज कमी ठेवा.
- १०० टक्के एकाग्रता आणि वचनबद्धता राखूनच गाडी चालवा. झोप येत असेल तर स्टिअरिंग हातात घेऊ नका.