पहिल्या टप्प्यात मातीच्या रस्त्यांवर खोदकाम
पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्यावर भर
जळगाव :
केंद्र व राज्य सरकारच्या सहयोगातून राबवण्यात येणार्या बहुप्रतिक्षित ‘अमृत’ या महत्त्वाकांक्षी योजनेच्या कामाला पुढील आठवड्यात सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील वाढीव भागाचा समावेश असणार आहे. पावसाळ्याचा विचार करून येथील मातीच्या रस्त्यांवर आधी खोदकाम करून जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण करण्यावर भर असणार आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून या योजनेचा आराखडा तयार करण्याचे काम प्रशासकीय पातळीवर सुरू होते. आराखड्याचे कागदोपत्री काम आता पूर्ण झाले असून योजनेच्या प्रत्यक्ष कामास गती येणार आहे. अमृत योजनेच्या माध्यमातून शहरात नव्याने सुमारे साडेचारशे किलोमीटर अंतराची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. या कामाची वर्कऑर्डर जैन इरिगेशन कंपनीला मिळाली आहे. त्यानुसार जैन इरिगेशन कंपनीकडून कामाला प्रारंभही झाला आहे.
महिनाभरापासून अमृत योजनेचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू होते. त्यात नव्या जलवाहिनीचे डिझाईन तयार करणे, पाण्याचा साठा करण्यासाठी ठिकठिकाणी जलकुंभ उभारणे अशा महत्त्वाच्या बाबींचा समावेश होता. विशेष म्हणजे, जलवाहिनी व जलकुंभांचे डिझाईन तयार झाले असून त्याला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मंजुरीदेखील दिली आहे. भविष्यात अमृत योजनेच्या माध्यमातून शहरात पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे पाण्याचा साठा तसेच वितरण करण्यासाठी शहरात सुप्रिम कॉलनी, रेमंड कंपनी परिसर, नित्यानंदनगर, निमखेडी, गेंदालाल मिल अशा सात ठिकाणी नवे जलकुंभ उभारावे लागणार आहेत. या जलकुंभांचे आरसीसी डिझाईन तयार करण्यात आले आहे. सुरक्षा व गुणवत्तेच्या दृष्टीकोनातून तयार झालेल्या डिझाईनची पडताळणी पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील (सीओईपी) तज्ज्ञ अभियंत्यांकडून केली जाणार आहे. सीओईपीने सुचवलेले बदल अंतिम करून हे डिझाईन फायनल होणार आहे.
‘सीओईपी’चे तज्ज्ञ अभियंते डिझाईनचे बारकाईने परीक्षण करत आहेत. त्यांचा अहवाल येत्या दोन ते चार दिवसात महापालिका प्रशासनाला प्राप्त होण्याची शक्यता आहे. त्यांनी सुचवलेले बदल विचारात घेऊन अंतिम डिझाईन तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष काम केले जाणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.
जमिनीचे परीक्षण पूर्ण
ज्या ठिकाणी नवे जलकुंभ उभारले जाणार आहेत; त्या ठिकाणाच्या जमिनीचेदेखील परीक्षण करण्यात आले आहे. जलकुंभ उभारण्यासाठी आरसीसीला चांगले फाउंडेशन (पक्का पाया) आहे का? याची पडताळणी करून शहरातील सात जागा निश्चित झाल्या आहेत.
तीन महिने हातात
एप्रिल, मे आणि जून असे तीन महिने पावसाळ्यापूर्वी हातात असल्याने पहिल्या टप्प्यात शहरातील वाढीव भागात अमृतची कामे होणार आहेत. पावसाळ्यात वाढीव भागांमध्ये कच्च्या रस्त्यांवर खोदकाम करताना मर्यादा येतात. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर दुसर्या टप्प्यात शहरातील प्रमुख भागांचा परिस्थितीनुसार विचार होऊ शकतो, असेही सूत्रांनी सांगितले.