जळगाव :
एलपीजी गॅस सिलिंडर घरोघरी वापर होत असला, तरी तो कसा वापरावा? त्याची काळजी कशा प्रकारे घ्यावी? अपघात झाल्यास, आग लागल्यास गॅस सिलिंडरचे काय करायला हवे? आदी बाबींची माहिती नागरिकांना नसते.
गेल्या दोन महिन्यांत जळगाव शहरातील दोन भागात लागलेल्या भीषण आगीच्या पार्श्वभूमीवर रेखा गॅस एजन्सीचे संचालक दिलीप चौबे यांनी आपत्कालीन काळात नागरिकांनी गॅस शेगडी व सिलिंडरची काळजी घेण्याबाबत सूचना केल्या आहेत.
शक्य झाल्यास सिलिंडरही बाहेर काढा - आग लागल्यानंतर प्रसंगावधान राखून घरातील सर्व सदस्यांना बाहेर काढल्यानंतर गॅसचे सिलिंडरही ताबडतोब घराबाहेर सुरक्षित ठिकाणी म्हणजे जिथपर्यंत आग पोहोचणार नाही, अशा ठिकाणी नेऊन ठेवणे खूप गरजेचे आहे. जेणेकरून आगीमध्ये सिलिंडरचा स्फोट होणार नाही.
गॅस लिक झाल्यास दारे व खिडक्या उघडा
काही वेळेस गॅसच्या चुकीच्या वापरामुळे किंवा लिकेजमुळेही आग लागू शकते. गॅस लिकेजचा वास आल्यास सतर्क राहून प्रथम सर्व दारे व खिडक्या उघड्या कराव्यात, इलेक्ट्रिकचे कोणतेही उपकरण चालू अथवा बंद करू नये, सिलिंडरवरील रेग्युलेटर काढून नॉबवर त्याची प्लास्टिकची कॅप लावून वितरकाला सूचित करावे.
काडेपेटी किंवा मेणबत्ती चुकूनही पेटवू नका
गॅस उपकरणातून कोठून लिक होत आहे हे पाहण्यासाठी काडीपेडी किंवा मेणबत्ती वगैरेचा वापर करु नये, काहीही कारणाने सुरू असलेली ज्योत बंद पडल्यास प्रथम गॅसचा कॉक बंद करावा. लगेच शेगडी पेटविण्याचा प्रयत्न करु नये, गॅसच्या वासाची तीव्रता संपूर्ण कमी झाल्यावरच गॅस उपकरण चालू करावे.
गॅस वितरकांशी साधा संपर्क
गॅस उपकरण घरच्या घरी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू नये. गॅसमधील कोणत्याही प्रकारच्या उपकरणाचा बिघाड झाल्यास आपल्या गॅस वितरकाशी संपर्क साधावा. सिलिंडर व गॅस शेगडीच्या सान्निध्यात इलेक्ट्रिक शेगडी, रॉकेल स्टोव्ह, कोळसा शेगडी अशा इतर उपकरणांचा वापर करू नये.
आयएसआय मार्क सुरक्षा नळी वापरा
५ वर्षे गॅरंटीसह, ट्रिपल कोटिंग असलेली, दीर्घकाळ टिकणारी आय.एस.आय. मार्कची सुरक्षा नळीच वापरावी. या नळीवर उंदरांचा उपद्रव, उष्णता, पाणी व प्रतिकूल वातावरणाचा परिणाम होत नाही.
काम झाल्यावर रेग्युलेटर बंद करा
काम संपल्यानंतर कॉक आणि रेग्युलेटर बंद करून ठेवावे, टी जॉईंट करुन रेग्युलेटरवर एकापेक्षा जास्त उपकरणांचा वापर प्रतिबंधक आहे. शेगडी सिलिंडरच्या जास्त जवळ ठेवू नये. तसेच शेगडी जमिनीपासून साधारण उंचीवर ठेवून स्वयंपाक करावा.
स्वयंपाक करताना सुती कपडे वापरा - स्वयंपाक घरात काम करीत असतांना अंगावर नेहमी सुती वस्त्र किंवा अग्नी प्रतिरोधक ऍप्रन वापरावा. टेरिकॉट, नॉयलॉन सारखे वस्त्र लगेच पेट घेतात. गॅस सिलिंडर नेहमी उभे ठेवावे, गॅस संपत आला म्हणजे सिलिंडर आडवे किंवा उलटे करून वेळ भागविण्याचा प्रयत्न करणे धोकेदायक होवू शकते. सिलिंडर व गॅस उपकरणास लहान मुलं हात लावणार नाहीत याची काळजी घ्यावी.