कमी पाण्यात घेता येतात फळ भाज्या, पालेभाज्या: फुलांचे रोप, औषधी वनस्पतीही लावा
जळगाव :
उन्हाळा सुरु झाला असून वाढते उष्णतामान आणि पाण्याचा वाढता वापर यामुळे भूजल आणि जलाशयाची पातळी कमी होते, साहजिकच नदी, तलाव, विहीर यांचे पाणी कमी होते. याचा एकूणच परिणाम भाजीपाला उत्पादन कमालीचे घटते, त्यामुळे या दिवसात भाज्यांचे भाव अधिक कडाडतात आणि गृहिणीच्या खर्चाचे गणित कोलमडते.
यासाठी विना मातीची शेती हा चांगला पर्याय आहे, अशी माहिती मू.जे.महाविद्यालयातील जलश्री विभागाच्या स्वाती समोदकर यांनी ‘तरुण भारत’ ला दिली.
ही शेती घराच्या छतावर टेरेस गार्डन या स्वरुपात किंवा घराच्या आजूबाजूला असलेल्या अगदी कमी जागेतही करता येते. यात वांगी, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, काकडी, भेंडी यासह मेथी, पालक, गिलके, कारले, भोपळा, दोडके यासारख्या भाज्या घेता येतात. एकदा बी लावल्यावर साधारण ४० ते ४५ दिवसात भाज्यांचे पीक येते. कमी पाण्यात येत असल्याने पाण्याचीही बचत होते.भाज्यांप्रमाणेच गुलाब, शेवंती, झेंडू, मोगरा यासारख्या इतर फुलांचेही रोप यात घेतले जाते. तसेच तुळस, पुदिना, अश्वगंध, गवती चहा यासारख्या औषधी वनस्पतीही घेता येतात. हे पूर्णपणे नैसर्गिक रित्या तयार होत नसल्याने अरोग्यासाठी उत्तम आहे.
कशी करावी विना मातीची शेती?
यासाठी वर्मीकूलाट, कोकोपीट हे आच्छादन घेवून एका प्लास्टिकच्या लहान किंवा पसरट भांड्यात ते बसवावे. हे कोकोपीट शेतीसाठी लागणार्या बी बियाणे यांच्या दुकानात उपलब्ध होतात. प्लास्टिकच्या भांड्याला खालच्या बाजूने एक छिद्र करावे जेणेकरून पाण्याचा निचरा होईल. फळभाज्या लावायच्या असल्यास कोकोपीटला मोठ्या आकाराचे ८ किंवा १० होल पाडून घ्यावेत. ती अशा प्रकारची असायला हवीत की त्यात बीज लावता आले पाहिजे. त्यात थोडे पाणी घालावे आणि हव्या असलेल्या भाज्यांचे बी त्यात लावावे. एकदा पाणी दिल्यावर साधारण दीड दिवसांनी पुन्हा पाणी द्यावे. असे सतत १० दिवस केल्यास बीजाला अंकुर फुटतात. साधारण ६ दिवसांनी ते पाणी बदलून घ्यावे. दिवसाला १ ते दीड पाणी यासाठी पुरेसे असते. पाणी शक्यतोवर झारीने द्यावे त्यामुळे रोपांना योग्य प्रमाणात पाणी मिळते. यातून ४० ते ४५ दिवसात चांगल्या फळभाज्या येतात. यासह फुलांचे रोप, तसेच औषधी वनस्पतीचे रोप यात घेता येतात. महिलांनी थोडा वेळ काढून घरीच ही शेती केल्यास आनंद मिळून भाजीपाल्याचा प्रश्नही नक्की सुटेल.