भाजपचे ज्येष्ठ नेते आ. एकनाथराव खडसेंना जळगावकर डॉक्टरचे खुले पत्र

    14-Feb-2018
Total Views | 17
 
 
मा. एकनाथ खडसे,
माजी मंत्री, म. रा.
मा. भाऊ सस्नेह नमस्कार.
 
 
गेले काही दिवस अनेक जळगावकरांचे बळी घेणार्‍या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाविषयी दररोज उलटसुलट बातम्या येत आहेत. ५ लाख जळगावकरांच्या जिव्हाळ्याचा, सुरक्षिततेचा हा प्रश्न तातडीने मार्गी लागणे आवश्यक आहे. यामधे अनेक तांत्रिक, प्रशासकीय अडचणी असल्याचे कळते.
 
 
मा. खडसेजी आपण जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील ताकदवान नेते आहात. व्यापक जनहितासाठी अनेक अडचणीचे प्रश्न, प्रशासकीय प्रश्नचिन्ह असलेल्या समस्या कायद्याच्या चौकटीत बसवून मार्गी लावण्यात आपला हातखंडा आहे हे महाराष्ट्राने बघितले आहे. विधिमंडळ व सरकारी कामकाजाचा आपला गाढा अभ्यास आहे याचा आम्हा जिल्हावासियांना विरोधक असलो तरी अभिमान आहे.
 
 
महामार्गाला समांतर रस्ते किंवा चौपदरीकरण हा प्रश्न आपल्या पुढाकाराने सोडविण्याची घोषणा २५ जानेवारी २०१६ रोजी, ना. नितीन गडकरी यांनी जळगावात केली होती. त्यामुळे खडसे साहेब आपण हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी वापरलेले वजन वादातीत आहे. त्याचे श्रेय आपल्यालाही मिळेलच. परंतु फक्त घोषणा करून जळगावकरांच्या वाढलेल्या अपेक्षांची पूर्ती तोपर्यंत होणार नाही जोपर्यंत या घोषणेला मूर्त स्वरूप येणार नाही.
 
 
आम्ही जळगावकर, आपल्याला विनंती करतो की आपण जे बोलतात ते करून दाखवितात असा आपला लौकिक आहे. तशी आपल्याबद्दलची जनभावना आहे. तिचा आपण सन्मान करून या शहरातून जाणार्‍या महामार्गाचे चौपदरीकरणाच्या कामातील सर्व दगडधोंडे दूर करून ५ लाख जळगावकरांना दिलासा द्यावा.
 
 
आपण विरोधी पक्षात असताना जिल्ह्याचे अनेक महत्वाचे प्रश्न मार्गी लावले आहेत. देशात, राज्यात आपल्याच पक्षाचे सरकार आहे. आपल्या सांगण्यावरूनच जळगावकर जनतेने विधानसभा आणि लोकसभेत आपण दिलेल्या उमेदवारांना भरभरून मते दिली.जळगावचे पालकमंत्री कुणीही असले तरी जिल्ह्यातील जनता आपल्यालाच सत्ताधारी पक्षातील ज्येष्ठ म्हणून पालक समजते. जर समांतर रस्त्यांच्या कामात काही अडचण असेल तर ती आपण दूर करावी. ना. नितीन गडकरी आपल्या शब्दाला खाली पडू देतील, असे वाटत नाही. दिल्ली भेटीतच आपण मार्ग काढणे आम्हाला अभिप्रेत होते. परंतु निधी परत जाण्याची दुर्दैवी बातमी देण्याचीच वेळ आपल्यावरच आली. त्यामुळे हा प्रलंबित प्रश्न सोडवणार्‍याबद्दलच जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
 
 
परवाच आपण आपल्या मतदारसंघातील आरोग्य, वैद्यकीय समस्या न सुटल्यास उपोषणाचा इशारा दिला. तसाच इशारा नव्हे उपोषणच आपण समांतर रस्त्यांचा निधी परत जात असल्यास करावे. जिल्ह्याचे नेते म्हणून आम्हा जळगावकरांची तशी अपेक्षा आपल्याकडून आहे. जळगावकरांवर अन्याय होत असेल तर आपण शांत बसणे आम्हाला अनपेक्षित आहे.
 
 
सध्या या महामार्गाची मालकी कुणाची यावरून संभ्रम निर्माण झाला आहे. गेल्या दोन-अडीच वर्षांपासून या प्रश्नांचा पाठपुरावा करताना मिळवलेल्या कागदपत्रांच्या आधारे मला असे वाटते की, हा फक्त प्रशासनाकडून बाऊ निर्माण करण्याचा प्रकार आहे. तशी मात्र वस्तुस्थिती नाही. हा प्रश्न तातडीने सुटावा यासाठी जे काही करता येईल ते आपण करावे. हवालदिल झालेल्या जळगावच्या जनतेला आपल्यामार्फत काहीतरी आश्वासक बातमी, वार्ता मिळावी यासाठी हे पत्र प्रयोजन!
डॉ. राधेश्याम चौधरी,
कार्याध्यक्ष, जळगाव शहर जिल्हा कॉंग्रेस
 
 
संबंधितांनी वास्तव समजून घ्यावे - खडसे
माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ज्या समांतर रस्त्याच्या चौपदरीकरणाची मागणी आणि त्यासाठी आंदोलन करण्यात आले तो रस्ता मूळात महापालिकेने ठराव करून आपल्या ताब्यात घेतलेला आहे. त्यामुळे महामार्ग चौपदरीकरणासाठी मंजूर झालेले १०० कोटी रुपये या मार्गासाठी खर्च करता येत नाहीत. शिवाय अमळनेरचे तत्कालीन आ. साहेबराव पाटील यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या मुद्यावर बोलताना सार्वजनिक बांधकाम खात्याचे तत्कालीन मंत्री छगन भुजबळ यांनी हा रस्ता जळगाव मनपाच्या ताब्यात असल्याचे स्पष्ट केले होते. आंदोलनाच्या वेळी जिल्हाधिकार्‍यांनी वास्तव जाणून न घेता लेखी दिले आहे. त्यामुळे संबंधितांनी समांतर रस्त्यासाठी त्यांच्याकडे पाठपुरावा केलेला बरा. खा. ए. टी. पाटील यांनी या कामी लक्ष घालण्याचे आश्‍वासन दिले आहे. मी त्यांच्या सोबत आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121