भावी पिढीच्या सक्षमीकरणात‘केशवस्मृती’चे कार्य कौतुकास्पद

    23-Oct-2018
Total Views | 17
 

भावी पिढीच्या सक्षमीकरणात
‘केशवस्मृती’चे कार्य कौतुकास्पद

जळगाव, २२ ऑक्टोबर
जन्म देणारी आई ज्याठिकाणी हात टेकवते, अशा गतिमंद मुलांना केशवस्मृती सेवा संस्था समूह आश्रय देते. हे एकप्रकारचे दैवी कार्य आहे. समाजातील दुर्लक्षित व्यक्तींना आणि घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य केशवस्मृती सेवा संस्था करते, असे प्रतिपादन बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांनी केले.
 
 
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात डॉ. हेडगेवार व्याख्यानमालेचे सोमवारी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. केशवस्मृती सेवा संस्था समूह आणि जळगाव जनता सहकारी बँक यांच्या निधीतून या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.
 
 
अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील तर केशवस्मृती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष नीळकंठ गायकवाड, विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य दिलीपदादा पाटील व्यासपीठावर होते.
 
केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरतदादा अमळकर, डॉ.जितेंद्र नारखेडे, किशोर कतांगे, उज्ज्वल पाटील, लता मोरे, प्रा. अजय सुरवाडे, मनीष जोशी आदी यावेळी उपस्थित होते.
 
घुगे म्हणाले की, घरातील मुलं काही दिवस, महिने, वर्षे घरातून निघून जातात किंवा हरवून जातात. त्यामुळे कुटुंबाला त्यांची उणीव नेहमी भासत असते. अशावेळी केशवस्मृती सेवा संस्था समूहाच्या चाईल्ड लाईनच्या सदस्याचा फोन त्या पालकांना येतो आणि आपले मूल संस्थेत आहे, असे सांगितले जाते. यावेळी पालकांना मिळणारा दिलासा आणि आनंद वेगळाच असतो. अशा प्रकारचे विविध कार्य केशवस्मृती सेवा संस्था समूहाच्या माध्यमातून होत आहे. समाजहित जपण्यासाठी डॉ. अविनाश रामचंद्र आचार्य (दादा) यांनी या संस्थेची स्थापना केली. त्यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा, असेही सांगून त्यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.
 
भारतीय संस्कृती ही मनातील चांगुलपणा टिकविण्याचे कार्य करते. एखादी चळवळ यशस्वी होण्यासाठी चळवळीत प्रत्येकाने आपले योगदान देण्याची भावना मनात निर्माण झाली पाहिजे. समाजाला दिशा देण्यासाठी विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमात सहभागी झाले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रकारे मावळ्यांना एकत्र आणून स्वराज्याची स्थापना केली, त्याचप्रमाणे एकत्रित येऊन संघटित होण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाने आत्मसात केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. पाटील यांनी व्यक्तिमत्त्व विकासासाठी अशा व्याख्यानांचा विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होतो, असे मत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ.सुनील पाटील यांनी केले.
 
हरविलेल्या मुलांसाठी १०९८ हेल्पलाईन
केशवस्मृती सेवा संस्था समूहाच्या १३ विविध समाजकार्य करणार्‍या संस्था आहेत. त्यापैकी रक्तपेढी, वृद्धाश्रम, मूकबधिर शाळा, नेत्रपिढी याद्वारे समाजहित जपले जाते. दोन वर्षात नेत्रहीन ५३ लोकांना नवी दृष्टी देण्याचे कार्य नेत्रपिढीने केले आहे. हरविलेल्या किंवा घर सोडून गेलेल्या मुलांसाठी १०९८ हा हेल्पलाईन क्रमांक चाईल्ड लाईन या संस्थेला प्राप्त झाला आहे. त्याचप्रमाणे कांचननगरातील पीडित सात वर्षीय मुलाचाही संस्था सांभाळ करीत आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121