‘वनवासी कल्याण आश्रम’ चा सेवा प्रकल्प: ३ तालुक्यात २७० एकल विद्यालये
शहादा, १६ ऑक्टोबर
आदिवासी, वनवासी, गिरीजन समाजबांधवांनासमाजाच्या, देशाच्या मूळ प्रवाहात समरसता, बंधुत्वभावाने सोबत घेण्यासाठी ‘एकल विद्यालय’हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. राष्ट्र आणि समाजाच्या चिरंतन आणि निरंतर कल्याणाचा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘वनवासी कल्याण आश्रम’ चा हा देशव्यापी सेवाप्रकल्प.
जे काम कोणत्याही सरकारला सहजासहजी करता येणार नाही, एवढ्या अत्यल्प पण पारदर्शी आणि लोकसहभागातून शहादा, अक्कलकुवा, धडगाव या तालुक्यांमध्ये दुर्गम क्षेत्रात, पाड्यापाड्यांवर हे पवित्र व उदात्त कार्य सुरु आहे. स्वामी विवेकानंद यांच्या भूमिकेनुसार ‘शाळेने विद्यार्थ्यांपर्यंत जावे’ या विचारांना प्रत्यक्षात आणण्याचा हा देशव्यापी प्रयत्न आहे. त्याचा श्रीगणेशा झाला तो झारखंडमध्ये १९८६ या वर्षी. पूर्व भारतात ‘एक शिक्षक, एक विद्यालय’ उपक्रमात ७५ हजार ५५९ एकल विद्यालयांद्वारे तब्बल २० लाख विद्यार्थ्यांना शालेय व जीवनशिक्षण देेण्याचा महायज्ञ सुरु आहे.
एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी किंवा सोयीच्या सार्वजनिक जागी, मोकळ्या जागी, अगदी झाडाखालीही हे विद्यालय भरते. स्थानिक किमान १० वी उत्तीर्ण कार्यकर्ता ते संचलित करतो. शहादा येथे दूरदर्शन कॉलनीत आँचल कार्यालय आहे, तेथे भाड्याच्या जागेत सुमारे २५ कार्यकर्त्यांना सुरुवातीला १ आठवडा आणि नंतर दरमहा ३ दिवस प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी त्याला आधी किमान ३ दिवस प्रशिक्षण दिले जाते. या दरमहा प्रशिक्षणाची शहादा, अक्कलकुवा, धडगाव येथे व्यवस्था आहे. तर १० विद्यालयांचा एक उपसंच, ३० विद्यालयांचा एक संच, ३ संचाचे (९० विद्यालये) १ संकुल आणि ३ संकुलांचे १ आँचल अशी संघटनात्मक रचना आहे.
अशा २७० आचार्याच्या कामकाजाचे संचालन किंवा व्यवस्थापन पूर्णवेळ २५ कार्यकर्ते बघतात. आँचल समितीच्या २१ सदस्यांची सर्वोच्च नियामक संस्था असते. तिचे अध्यक्षपद सध्या शहाद्याचे डॉ.वसंत अशोक पाटील यांच्याकडे आहे. त्यांचे डोंगरगाव मार्गावर ‘सुदर्शन नेत्रालय’ आहे, नेत्रतज्ज्ञ म्हणून ते १८ वर्षापासून सेवा देत आहेत. उपाध्यक्षपदाची जबाबदारी शहाद्याचे महेंद्र चौधरी हे सांभाळताहेत. त्यांचे शहाद्यातील मुख्य मार्गावर राणी मेडिकल हे प्रतिष्ठान आहे. सचिव आहेत रमेश छगन पटेल (देना बँक शाखेचे निवृत्त व्यवस्थापक)आणि अभियानप्रमुख आहेत पूर्ण वेळ कार्यकर्ते मांगीलाल वसावे (रा.भगदरी ता.अक्कलकुवा)
या शाळांना फळा, खडू, वर्णाक्षर, अंक, वस्तू, पदार्थ इ.इ.चे तक्ते, विविध शैक्षणिक साहित्यही पुरविले जाते. शिवाय आचार्याच्या पुढाकाराने आणि स्थानिक नागरिक, कार्यकर्त्यांच्या मदतीने त्या त्या परिसरात शासकीय योजनांची कार्यवाही, भारतीय सण, उत्सव, शोषखड्डे, पर्यावरण व जलसंधारण कामे, वनसंरक्षण, गांडूळ शेती, जैविक शेती असे कितीतरी उपक्रम पार पडतात. आचार्याचे दरमहा हजार रु. मानधन, शैक्षणिक साहित्य इ. सह वार्षिक सुमारे २० हजार खर्च येतो. हा निधी परिसरातील दानशूर, शिक्षणप्रेमींकडून उभा केला जातो. एकल विद्यालयाच्या नामफलकावर त्याचे/त्यांचे नाव दिलेले असते.
या आँचलातील सर्व २७० एकल विद्यालयांचा काटकसर आणि पारदर्शकरित्या होणारा वार्षिक खर्च ४५ लाखात जातो. देशभरात होणारा अवाढव्य खर्चाचा अर्धा भार अमेरिकेतील स्थायिक भारतीयांची ‘एकल फाउंडेशन’ सोसत असते. भविष्यात देशभरातील आवश्यक तेथे असे १ लाख एकल विद्यालये सुरु करण्याचा प्रयत्न आहे, यावरुन या सेवाकार्याचा आवाका आणि संघ परिवाराच्या इच्छाशक्तीची कल्पना येते. या सेवकार्याच्या संवर्धनासाठी त्यांना शासन, प्रशासन आणि सर्व थरातील लहान-मोठ्या समाजबांधवांचे यथाशक्ती अर्थ आणि आवश्यक त्या वस्तूरुपाने सहकार्य हवे आहे, तरच या समाज व राष्ट्र उभारणीच्या रचनात्मक कार्यात सातत्य राहात त्याला संजीवनी मिळणार आहे. (अधिक माहितीसाठी डॉ.वसंत अशोक पाटील यांच्याशी ९४२२७ ९१२८८ संपर्क साधता येईल.)
अशी असते एकल शाळा...
गाव, पाडा येथे आधी सर्वेक्षण करुन शाळेत न जाणार्या किंवा जाऊ न शकलेल्या ४ ते १४ वर्ष वयोगटातील मुला-मुलींचा शोध घेण्यात येतो. आचार्य व विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार रोज ३ तास (सकाळी किंवा सायंकाळी) हे विद्यालय सोयीच्या ठिकाणी चालवले जाते. त्यात २५ च्या आसपास विद्यार्थी असतात. व्यवस्थापनासाठी रहिवाशांमधून ७ सदस्यांची समिती स्थापन केली जाते, त्यात शिक्षणप्रेमी आणि वेळ देऊ शकणार्या सेवाभावी महिला-पुरुषांचा समावेश असतो. संच व आँचल, संकुल स्तरावरही अशी समिती असते. समितीच्या प्रत्येक कार्यात पारदर्शकता असते. आचार्याचा प्रवास, किती वेळ विद्यालय चालवले, यांचे दप्तर व्यवस्थित ठेवले जाते. विद्यार्थ्यांची परिक्षा घेतली जाते, भारतीय खेळांच्या क्रीडा स्पर्धा ३ स्तरावर होतात. अंतिम विजेत्यांना भागस्तरावर खेळायची संधी मिळते. जी मुलं परीक्षांमध्ये चमक दाखवतात, त्यांना त्या गुणवत्तेच्या जोरावर जि.प.शाळेत चौथीत प्रवेश मिळतो. पटसंख्या टिकवण्याच्या स्पर्धेत अनेक जि.प.शाळांना अनेक एकल विद्यालये सहाय्यभूत ठरत आहेत.
‘वनयात्रा’ :सामाजिक
ऐक्यभावनेलाही बळ
परिसरातील मान्यवर नागरिक, दानशूर शिक्षणप्रेमी, पालकांनी विद्यालयाला भेट द्यावी, असे कायमस्वरूपी आवाहन केले जात असते. ज्या वेळी अशा भेटी ठरतात, तेव्हा होणार्या उपक्रमाला ‘वनयात्रा’ संबोधले जाते. पारंपारिक ढोलवादन आणि आरती, पूजा इ. विधी करुन उत्साहाने होणार्या या उपक्रमाद्वारे समरसता, सामाजिक ऐक्यभावनेलाही बळ मिळते.