शेंदुर्णीला ’तरूण भारत’ अल्पना कला स्पर्धा-२०१८ अंतर्गत रांगोळी स्पर्धेत
शेंदुर्णी, १६ ऑक्टोबर
‘जळगाव तरूण भारत’ने शेंदुर्णी येथे मंगळवार, १६ ऑक्टोबर रोजी राणी लक्ष्मीबाई महिला सह. पतसंस्थेच्या सहकार्याने आयोजित अल्पना कला स्पर्धाअंतर्गत घेतलेल्या रांगोळी स्पर्धेत कीर्ती योगेश तायडे यांनी प्रथम तर द्वितीय पुरस्कार नेहा विजय सोनवणे यांनी पटकावला. तृतीयस्थानी शुभदा भगवान बैरागी राहिल्या. पारस जैन मंगल कार्यालयात अत्यंत उत्साहात पार पडलेल्या या स्पर्धेत सुमारे ८७ स्पर्धक सहभागी झाले होते. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन संजय गरुड होते. तसेच व्यासपीठावर पारस जैन सह. पतसंस्थेचे चेअरमन प्रकाश झंवर, राणी लक्ष्मीबाई महिला पतसंस्थेचे तज्ञ संचालक उत्तमराव थोरात, दीनदयालजी उपाध्याय सह. पतसंस्थेचे चेअरमन अमृत खलसे, उपाध्यक्ष संदीप ललवाणी, शिवसेना तालुका प्रमुख पंडित जोहरे, विहिंप प्रांत कार्यकारिणी सदस्य वामनराव फासे, ललवाणी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रमोद खलचे, गुरुकुल विद्यालयाच्या प्राचार्या डॉ.भक्ती कुलकर्णी, गुरुकुल विद्यालयाच्या संचालिका शुभांगी कुलकर्णी, प्रा.डॉ.योगिता चौधरी, गरुड महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. आर.जी.पाटील, राणी लक्ष्मीबाई महिला पतसंस्थेचे कार्यकारी संचालक रवींद्र सूर्यवंशी, संचालिका ममता जैन, कीर्ती अग्रवाल, सुनीता जोहरे, गरुड विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.आर.शिंपी, शामाप्रसाद मुखर्जी संस्थेचे अध्यक्ष किरण बारी, सूर्योदय फाऊंडेशनचे अध्यक्ष दिग्विजय सूर्यवंशी, दुर्गावाहिनी प्रांत संयोजिका शुभांगी फासे, राणी लक्ष्मीबाई महिला बचत गटाच्या अध्यक्षा रंजना धुमाळ, परीक्षक राजू बाविस्कर, दामू चौधरी, संस्कार भारतीच्या मातृशक्ती प्रमुख (देवगिरी प्रांत) सुनंदा किशोर सुर्वे आणि संस्कार भारतीच्या रांगोळी विभाग सदस्या संघमित्रा मिलिंद सावदेकर, माधव बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष नंदू नागराज अणि ‘तरुण भारत’चे निवासी संपादक दिनेश दगडकर आदी होते.
मान्यवरांच्या सत्कारानंतर नंदू नागराज यांनी या स्पर्धेमागील ‘तरुण भारत’ची भूमिका विशद केली. परीक्षकांतर्फे राजू बाविस्कर यांनी स्पर्धेचा आढावा घेतला तर संस्कार भारतीच्या सुनंदा सुर्वे यांनी रांगोळी कलेला उत्तेजन देण्याच्या तरुण भारतच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
रांगोळीतून स्पर्धकांनी बेटी बचाओ, बेटी पढाओ, पर्यावरण, जल समस्या, वीज संकट, स्त्री अत्याचार असे अनेक समाजमनावर परिणाम करणारे विषय अत्यंत प्रभावीपणे हाताळल्याने प्रेक्षकांनाही त्याची परिणामकारकता जाणवली.
संजयदादा गरूड, उत्तमराव थोरात आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. प्रथम पुरस्काराची मानकरी कीर्ती योगेश तायडे यांना १००१/रू. रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, नेहा विजय सोनवणे यांना द्वितीय पुरस्कार ७०१/रू. रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र तर शुभदा भगवान बैरागी यांना ५०१/रू. रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. उत्तेजनार्थ बक्षिसे गायत्री तेली आणि आश्विनी जोशी यांना प्रत्येकी २०१/- रू. देण्यात आली.
दरम्यान दुपारी पाचोरा पीपल्स बँकेचे उपाध्यक्ष राजमल अग्रवाल यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रमोद सरोदे, प्रास्ताविक विजय नाईक तर आभार ‘तरुण भारत’चे प्रतिनिधी अतुल जहागिरदार यांनी मानले. तरुण भारत परिवारातील प्रशासकीय अधिकारी भगवान उगले आणि अनिकेत आफे्र यांनीही सहकार्य केले.
‘तरुण भारत’चा उपक्रम अनुकरणीय - संजयदादा गरुड
रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून मुली आणि महिलांना त्यांच्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळते. पुरस्कारापेक्षाही अशी संधी मिळणे अधिक महत्त्वाचे आहे. तरुण भारतने अशी संधी उपलब्ध करून देण्यात जो पुढाकार घेतला आहे तो वाखाणण्याजोगा आहे. अनुकरण करण्यासारखा आहे. रांगोळीतून बेटी बचाओ, बेटी पढाओ असा संदेश देण्यात आल्याबद्दल कार्यक्रमाचे अध्यक्ष संजयदादा गरूड यांनी स्पर्धकांचे कौतुक केले.
८७ स्पर्धकांचा सहभाग
रांगोळी स्पर्धेसाठी दुपारपासून स्पर्धकांनी सहभाग घेतला. या रांगोळी स्पर्धेत ८७ स्पर्धक सहभागी झाले होते. आकर्षक रंग, प्रमाणबद्ध रचना आणि समाजाला सध्या भेडसावणार्या रांगोळींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दुपारी जि.प. सदस्या सरोजिनी गरूड यांनी स्पर्धास्थळी भेट दिली
राणी लक्ष्मीबाई महिला सह.पतसंस्था यांचे सहकार्य
या स्पर्धेसाठी राणी लक्ष्मीबाई महिला सह.पतसंस्थेच्या सर्व संचालिका आणि कर्मचारीवृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्वांनी ही रांगोळी स्पर्धा उत्तम नियोजनाने अविस्मरणीय केली.
प्रथम, द्वितीय अन् तृतीय पारितोषिक
* प्रथम - कीर्ती तायडे, १००१/रू रोख,स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र
* द्वितीय - नेहा सोनवणे ७०१/रू रोख,स्मृतिचिन्ह
* तृतीय - शुभदा बैरागी ५०१/रू रोख, स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र
पाच प्राविण्य पारितोषिके
शुभांगी नागणे, माधुरी सोनवणे, सृष्टी पाटील, शीतल जहागिरदार आणि गुंजन सांखला यांना प्रत्येकी १०१/रू., प्राविण्य पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले.