मुंबई : आयसीसीने नुकतेच टी-२० विश्वचषकच्या आयोजनाची तारीख जाहीर केली. आता ही स्पर्धा भारतात नव्हे तर युएईमध्ये होणार असल्यचे स्पष्ट केले आहेत. तसेच, आयपीएल २०२१चा अंतिम सामना झाल्यानंतर लगेच २ दिवसांनी म्हणजे १७ ऑक्टोबरपासून ही स्पर्धा सुरु होणार आहे. भारतामध्ये कोरोनाची परिस्थिती पाहता आयसीसीने या स्पर्धेचे आयोजन यूएई आणि ओमानमध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे. अद्याप आयसीसीने याबाबतीत अधिकृत माहिती जाहीर केली नसून लवकरच याबाबतीत घोषणा केली जाईल असे सांगण्यात येत आहे.
आयपीएल २०२१चे उर्वरित सामने हे यूएईमध्ये होणार असून १५ ऑक्टोबरला या स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे, हे यापूर्वीच बीसीसीआयने जाहीर केले होते. यानंतर लगेच २ दिवसांमध्ये आयसीसी टी-२०चे आयोजन होणार असल्याचे सांगितले जात आहे. १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबरपर्यंत ही स्पर्धा असेल. विशेष म्हणजे, १ जून रोजी आयसीसीने बीसीसीआयला टी-२० विश्वचषकच्या आयोजना संदर्भात निर्णय घेण्यासाठी जून अखेरपर्यंतची मुदत दिली होती. पण भारतातील कोरोनामुळे उद्भवलेली स्थिती पाहता टी-२० विश्वचषकचे आयोजन करणे कठीण आहे. यासोबतच आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा सुद्धा यूएईमध्ये होत आहे. अशा परिस्थितीत टी-२० विश्वचषकच्या आयोजनासाठी यूएई योग्य जागा असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयसीसी टी-२० विश्वचषक दोन टप्प्यांमध्ये खेळवला जाईल. पहिला टप्पा हा यूएईमध्ये आणि ओमानमध्ये आयोजित केला जाणार आहे. पहिल्या राऊंडमध्ये १ ते १२ सामने होतील ज्यामध्ये ८ संघांमध्ये सामने होतील. या ८ संघांपैकी ४ संघ सुपर १२ साठी पत्र ठरतील. त्यानंतर सुपर १२मध्ये एकूण ३० सामने होणार आहेत. २४ ऑक्टोबर पासून या सामन्यांची सुरुवात होणार असून सुपर १२ मधील संघांना ६-६ अशा दोन गटात विभागले जाईल. हे सामने यूएईतील दुबई, अबूधाबी आणि शारजाह येथे खेळवल्या जातील, अशी माहिती सांगण्यात देण्यात येत आहे.