
इगतपुरीजवळ मुंबई -हावडा मेल एक्सप्रेसचे ३ डबे घसरले
भुसावळ, १० जून
मध्य रेल्वेच्या इगतपुरी रेल्वे स्थानका जवळ १० रोजी रात्री २ वाजेला गाडी क्र. १२८०९ मुंबई-हावडा मेल व्हाया नागपूर या गाडीचे तीन डबे रुळावरुन घसरले.सुदैवाने त्यात कोणतीही हानी झाली नाही. त्यामुळे या मार्गावरुन धावणार्या काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला होता. सकाळी ६ वाजेला रेल्वे मार्ग सुरळीत झाला.
१० रोजी गाडी क्र. २२१०२ /२२१०१ राज्यराणी एक्सप्रेस , १०११०/०९ पंचवटी एक्सप्रेस , १२११८/१७ गोदावरी एक्सप्रेस रद्द करण्यात आली .
तर गाडी क्र. ५११५४ भुसावळ-मुंबई पॅसेंजर ही गाडी नाशिकरोड रेल्वे स्थानका पर्यंतच धावणार आहे. तर गाडी क्र. ५११३ मुंबई- भुसावळ पॅसेंजर ही गाडी नाशिक रोड स्थानकापासून धावली.
गाडी क्र. १२१६७ लो.टी.ट.वाराणसी एक्सप्रेस ही गाडी पूणे , दौड मार्गे वळविण्यात आली.
तसेच गाडी क्र. ११०९३ मुंबई - वाराणसी महानगरी एक्सप्रेस , १२८११ लो.टी.ट.-हटिया एक्सप्रेस वसईरोड , सुरत, जळगाव मार्गेे वळविण्यात आल्या.
सकाळी ६ वाजेला रेल्वे मार्ग सुरळीत झाला आणि वाहतुक सुरु झाली. सर्व प्रवाशांना नाशिकरोड, मनमाड रेल्वे स्थानकावर मोफत अल्पोपहार देण्यात आला. तर भुसावळ रेल्वे स्थानकावर मोफत भोजन व्यवस्था करण्यात आली. मनमाड रेल्वे स्थानकावर ३ शयनयान डबे जोडण्यात आले.तर भुसावळ रेल्वे स्थानकावर तीन सर्वसाधारण डबे जोडण्यात आले.