भुसावळ, २८ मे :
भुसावळ शहरातील सर्वे नं. ५९ ते ६१ व ७७ मधील नागरिकांना नळजोळणी साठी ५ हजार आणि पाणीपट्टीसाठी १ हजार ५०० रुपये मोजावे लागत आहे. या पैसे वसुली मागे कोण हा चर्चेचा विषय शहरात निर्माण झाला आहे.
भुसावळ शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. शहरातील विवेकानंद नगर,पांडुरंगनाथ नगर, सरस्वती नगर, गोकुळ नगर, पुजा कॉम्पलेक्स, सदगुरु नगर, राका कॉलनी, यशोधन नगर परिसरातील नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी २१ फेब्रुवारी २०१८ रोजी उपविभागीय अधिकारी भुसावळ यांच्या कार्यालया समोर उपोषण केले होते. खा.रक्षा खडसे यांनी उपोषणस्थळी भेट देवून उपोषणार्थींची समजुत घातली होती. तसेच येथे पाणी पुरवाठा योजना सुरु करण्याचे आश्वासन दिले होते . त्यानुसार मार्च महिन्यात १३ लाख ४९ हजार ६५९ रुपये किमतीची मंजुरी मिळून जलवाहिनेचे काम सुध्दा झाले.जमीनी पासून अल्प खोलीवर ही पाईप लाईन टाकण्यात आली.
नागरिकांच्या सेवेसाठी जलवाहिनी टाकण्यात आली परंतु परिसरातील नागरिकांनी खाजगी कार्यकारणी स्थापन करुन आपआपसात चर्चा करुन ज्यांना नळजोडणी घ्यावयाची असेल त्यांना ५ हजार रुपये व नळपट्टीचे १ हजार ५०० रुपये द्यावे लागतील. असे शुल्क दिले तरच त्यांना कनेक्शन देण्यात येईल. जे नागरिक दोन महिन्यानंतर नळकनेक्शन घेतील त्यांना ७ हजार ५०० रुपये मोजावे लागणार आहेत.
येथील नागरिकांची पाण्याची समस्या दुर करण्यासाठी सरकारने तात्पुरती योजना सुरु केली आहे. या परिसरात काही नागरिक मोलमजुरीकरुन उदरनिर्वाह करतात. एका व्यक्तीने सोशल मिडीयावर परिसराती नागरिकांचा गृप बनवून नळजोळणी साठी ५ हजार रुपये जमा करण्याचे आवाहन केले आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी बारकु साळुंखे रा. विवेकानंद नगर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दिला आहे.