लोकशाहीदिनी १२६ अर्ज
जळगाव, 12 नोव्हेंबर
दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणारा लोकशाही दिन आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला.
या लोकशाहीदिनी जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांच्या तक्रारी सर्व विभागांच्या जिल्हास्तरीय अधिकार्यांनी तक्रारदारांच्या जागेवर जाऊन जाणून घेतल्या. लोकशाहीदिनी 126 तक्रार अर्ज दाखल झाले.
यामध्ये सहकार, जिल्हा परिषद, महसूल, कृषी, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, पोलीस यासह इतर विभागांच्या तक्रारींचा यामध्ये समावेश आहे.
या लोकशाही दिनास अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी, अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, महावितरणचे कार्यकारी अभियंता शिवाजी भालशंकर, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, चिटणीस मंदार कुलकर्णी, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त खुशाल गायकवाड यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
लोकशाही दिनाच्या कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी लोकशाही दिनात प्राप्त झालेल्या तक्रारींचा आढावा घेतला.
लोकशाहीदिनी प्राप्त तक्रारी सर्व संबंधित विभागांकडे पाठविण्यात आल्यानंतर त्या तक्रार अर्जांवर संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी संबंधित विभागप्रमुखांना दिलेत.