मुंबई(MPSC Recruitment 2026) : "मंत्रिमंडळ बैठकीत ‘एमपीएससी’संदर्भात पाच विभागांचे सादरीकरण झाले. प्रत्येक बैठकीत पदे किती आहेत, रिक्त किती आणि ‘एमपीएससी’कडे किती मागणी केली, असे नियमित केले आहे. त्यामुळे पुढच्या परीक्षेत आतापर्यंतचे सगळे विक्रम मोडणारी पदे आणण्याचा निर्णय आम्ही केला आहे. यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांची रिक्त पदे भरण्यासंदर्भातही वेगळी व्यवस्था करण्यासंदर्भात विचार सुरू आहे. ‘एमपीएससी’बाबत समितीचा अहवाल आल्यानंतर आम्ही त्यावर निर्णय करणार आहोत,” असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. (MPSC Recruitment 2026)
"आम्हाला राजकीय मागणीत इंटरेस्ट नाही. त्याचे जे व्हायचे असेल, ते होईल. आम्हाला रस विद्यार्थ्यांच्या मागण्यांमध्ये असून त्यांची प्रत्येक मागणी जी न्याय्य आहे, ती राज्य सरकार पूर्ण करेल,” अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’च्या (एमपीएससी) पेपरफुटी प्रकरणी होत असलेल्या ‘एमपीएससी’च्या अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवर त्यांनी प्रतिक्रिया दिली. (MPSC Recruitment 2026)
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मुळात ज्यासंदर्भात ‘एमपीएससी’च्या अध्यक्षांचा राजीनामा मागणे सुरू आहे, त्या परीक्षा किंवा तो घोटाळाच ते रूजू होण्याच्या आधी झालेला आहे.
‘एमपीएससी’संदर्भात भरती करण्याचे अधिकार राज्यपालांचे आहेत. पण एकप्रकारे केवळ राजकीय मागणी करणे, कधीच हिताचे नाही. एखादी व्यक्ती एखाद्या संस्थेत काय काम करते, त्यांनी केलेल्या कामाचे मूल्यमापन काय, याचा विचार न करता, कुठलीही चौकशी न करता, कुठलेही पुरावे न देता, अशा प्रकारची मागणी केली जात आहे.” (MPSC Recruitment 2026)
बहुपर्यायी पद्धत लागू करण्याची मागणी
ते पुढे म्हणाले की, "व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली परीक्षा प्रकारासंदर्भात चांगल्या सुनावण्या सुरू आहेत. या समित्या सगळ्यांचे म्हणणे ऐकून घेत आहेत. या परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वस्तुनिष्ठ (बहुपर्यायी) पद्धत लागू करण्याची मागणी येत आहे. दळवी समितीने बहुपर्यायी पद्धतीवरून वर्णनात्मक पद्धतीकडे जाण्याचा अहवाल दिला होता. त्यानुसार, शासनाने आणि ‘एमपीएससी’ने निर्णय घेतला होता. परंतु, आता पुन्हा एकदा बहुपर्यायी पद्धत लागू करण्याची मागणी जोर धरत आहे.” (MPSC Recruitment 2026)