मुंबई (Shiv Sena attack on UBT ) : नसानसात भिनलेले विचार कसे गोठवणार ? असे म्हणत व्यंगचित्राच्या माध्यमातून शिवसेनेने आपल्या एक्स हॅण्डलवरून उबाठावर प्रहार केला आहे. बुधवार दि. १९ रोजी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत उबाठाने उपमूख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याची मागणी केली आहे. यावर जोरदार प्रहार करताना शिवसेनेने व्यंगचित्राच्या माध्यमातून,' नसानसात भिनलेले विचार कसे गोठवणार ?' असा सवाल उबाठावर उपस्थित केला आहे.
या व्यंगचित्रात न्यायाधीशांच्या समोर एका बाजूस उद्धव ठाकरे आणि उबाठाची बाजू मांडणारे विधी तज्ञ कपिल सिब्बल उपस्थित असून दुसऱ्या बाजूस उपमूख्यमंत्री एकनाथ शिंदे वाघासह उभे आहेत आणि त्यांच्या हातात धनुष्यबाण आणि भगवा झेंडा आहे.एकनाथ शिंदे यांच्यावर बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आहेत असे दाखवले आहे. उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांच्याकडे बोट करून न्यायाधीशांना सांगत आहेत की , "जजसाहेब,यांच्याकडे बाळासाहेब ठाकरे यांचे विचारही आहेत, तेही गोठवा." एकूणच ज्या व्यंगचित्राच्या माध्यमातून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी सुरुवातीला शिवसेना उभारली आणि अन्यायाविरुद्ध वाचा फोडली,त्याच व्यंगचित्राचा वापर करून शिवसेनेने उबाठा गटावर तोफ डागली आहे. (Shiv Sena attack on UBT )