
मुंबई (Vijay Wadettiwar Sharad Pawar Statement) : देशभरात परिसीमन विधेयकावरून राजकीय वातावरण तापले असताना, या विधेयकाला पाठिंबा दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करणारे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अवघ्या एका दिवसात आपली भूमिका मवाळ केली आहे. “शरद पवार यांनी या विधेयकातून पाठिंबा मागे घेतला, तर त्यांच्या पायावर डोके ठेवून माफी मागेन. त्यांनी सांगितल्यास राजकारणही सोडेन,” असे विधान वडेट्टीवार यांनी रविवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी माध्यमांशी संवाद साधताना केले.
काय म्हणाले विजय वडेट्टीवार?
पत्रकारांशी संवाद साधताना विजय वडेट्टीवार यांनी आपल्या आधीच्या विधानामागे कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता, असे स्पष्ट केले. “पवारसाहेबांनी परिसीमन विधेयकाला दिलेला पाठिंबा मागे घेतला, तर मी त्यांच्या पायावर डोके ठेवून माफी मागेन,” असे ते म्हणाले. (Vijay Wadettiwar Sharad Pawar Statement)
पुढे बोलताना वडेट्टीवार यांनी शरद पवार यांच्या धर्मनिरपेक्ष विचारसरणीचा उल्लेख केला. “आमच्या मनात पवारसाहेबांची धर्मनिरपेक्ष विचारसरणीची प्रतिमा कायम आहे. त्यांनी या विधेयकाचा पाठिंबा मागे घेतल्यास मी काहीही करण्यास तयार आहे. अगदी त्यांनी सांगितल्यास राजकारणही सोडेन,” असे त्यांनी म्हटले.
शनिवारी शरद पवारांवर केली होती बोचरी टीका
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) हे महाराष्ट्रात एकमेकांचे राजकीय सहयोगी आहेत. मात्र, शनिवारी वडेट्टीवार यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. (Vijay Wadettiwar Sharad Pawar Statement)
“पवारांचा इतिहास लोकांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा आणि त्यातून फायदा मिळवण्याचा राहिला आहे. त्यांनी पुन्हा एकदा तेच केले आहे,” असे वडेट्टीवार म्हणाले होते. तसेच, हा पक्ष सत्तेशिवाय जिवंत राहू शकत नाही आणि त्यांची कोणतीही विचारधारा नाही, अशी टीकाही त्यांनी केली होती.
“पाण्याशिवाय मासा जसा तडफडतो, तशी त्यांची अवस्था झाली आहे. आम्ही त्यांना राज्यसभेवर पाठवले. मात्र, लोकशाही संपवणाऱ्यांचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा त्यात त्यांचे नाव नक्की असेल,” असे विधानही त्यांनी केले होते. (Vijay Wadettiwar Sharad Pawar Statement)
पवार आणि स्टॅलिन यांच्याशी चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न
या वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे रविवारी शरद पवार यांची भेट घेऊन परिसीमन विधेयकाबाबत चर्चा करणार असल्याचे वृत्त आहे.
याशिवाय, काँग्रेसचे वरिष्ठ नेते द्रमुक अध्यक्ष आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्याशीही चर्चा करणार आहेत. स्टॅलिन यांनी परिसीमन प्रक्रियेला पाठिंबा दर्शवला असल्याने काँग्रेस नेतृत्व त्यांची भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले जात आहे. (Vijay Wadettiwar Sharad Pawar Statement)