मुंबई (Devendra Fadnavis on Women Reservation) : परिसीमन विधेयक आणि महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या विधेयकांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी थेट, ‘त्यावेळी झोपले होते का?’ असा सवाल केला. तसेच विरोधकांची भूमिका ‘महिलाविरोधी’ असल्याची टीकाही त्यांनी केली.
‘त्यावेळी कायद्यातील तरतुदींना मान्यता दिली, मग आता विरोध का?’
२०२३ मध्ये संसदेत महिला आरक्षणासंदर्भातील कायद्याला मंजुरी देण्यात आली होती. या कायद्यानुसार महिला आरक्षणाची अंमलबजावणी जनगणना आणि मतदारसंघांच्या पुनर्रचनेशी जोडण्यात आली होती. त्यावेळी विरोधकांनीही या कायद्याला पाठिंबा दिला होता. मग आता याच प्रक्रियेवर आक्षेप का घेतला जात आहे, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. (Devendra Fadnavis on Women Reservation)
‘विरोधक त्यावेळी झोपले होते का? तेव्हा त्यांनी कायद्यातील तरतुदींना मान्यता दिली आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्यक्षात ही योजना राबवत असताना डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून विरोध सुरू केला आहे. यावरून विरोधकांची महिला आरक्षणाबाबतची मानसिकता स्पष्ट होते,’ अशा शब्दांत फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली.
‘तक्रारी करण्याऐवजी इंडी आघाडीवर लक्ष द्या’
विरोधकांनी सातत्याने तक्रारी करण्याऐवजी इंडी आघाडीच्या अंतर्गत परिस्थितीकडे लक्ष द्यावे, असा सल्लाही फडणवीस यांनी दिला. परिसीमन आणि मतदारसंघांच्या पुनर्रचनेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महिलांसाठी जागा आरक्षित होतील, असे त्यांनी स्पष्ट केले. (Devendra Fadnavis on Women Reservation)
२०२९ मध्ये सर्व राज्यांच्या विधानसभा आणि लोकसभेत महिलांसाठी ३३ टक्के जागा आरक्षित असतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
एकीकडे २०२९ पर्यंत महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी परिसीमनाची प्रक्रिया महत्त्वाची असल्याचे सत्ताधारी पक्षाकडून सांगितले जात आहे. मात्र, या प्रक्रियेवरून विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. अशातच फडणवीस यांनी केलेल्या टीकेमुळे महिला आरक्षण आणि परिसीमनाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. (Devendra Fadnavis on Women Reservation)