नवी दिल्ली (Mp Ramrao Wadkute Death) : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून दुःखद बातमी समोर आली आहे. भाजपचे राज्यसभा खासदार रामराव सखाराम वडकुते यांचे रविवार, दि. २२ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील एम्स रूग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. वयाच्या ७२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. छातीत त्रास जाणवू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने हिंगोली जिल्ह्यासह मराठवाड्यात शोककळा पसरली आहे.
अवघ्या आठ महिन्यांपूर्वी भाजपने त्यांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवले होते. यापूर्वी त्यांनी शेळी-मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती. (Mp Ramrao Wadkute Death)
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश
रामराव वडकुते यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून केली होती. ऑक्टोबर २०१९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य म्हणून काम पाहिले होते. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख आणि प्रभारी म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. (Mp Ramrao Wadkute Death)
राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय प्रवास
शरद पवार यांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर पक्षात ओबीसी समाजातून पुढे आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये रामराव वडकुते यांचा समावेश होता. पक्षात ते माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांचे समर्थक म्हणून ओळखले जात होते. (Mp Ramrao Wadkute Death)
२००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. धनगर-हटकर समाजातील त्यांचे स्थान आणि पक्षसंघटनेतील योगदान लक्षात घेऊन पक्षाने त्यांच्यावर इतर जबाबदाऱ्या सोपवल्या. त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेली जबाबदारीही देण्यात आली होती. पुढे राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना विधान परिषदेवर संधी दिली.
धनगर समाजाच्या प्रश्नांसाठी कार्यरत असलेले आणि मराठवाड्यात राजकीय व सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले रामराव वडकुते यांच्या निधनाने राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे. (Mp Ramrao Wadkute Death)