मुंबई (NSE Telegram scam warning): शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात टिप्स देणाऱ्या ‘Trading Expert’ नावाच्या टेलिग्राम चॅनेलपासून गुंतवणूकदारांनी सावध राहावे, असा इशारा नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) ने दिला आहे. संबंधित टेलिग्राम चॅनेलची लिंक ‘trading_jackpot_sankhat_bulls’ अशी असून, या चॅनेलचा एनएसईशी कोणताही संबंध नसल्याचे एक्स्चेंजने स्पष्ट केले आहे. एनएसईने गुंतवणूकदारांना शेअर बाजारात निश्चित, हमी किंवा आश्वासित परतावा देण्याचे सांगणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेच्या योजना अथवा उत्पादनांमध्ये सहभागी न होण्याचा सल्ला दिला आहे. अशा प्रकारच्या योजना कायद्याने प्रतिबंधित आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी अशा ऑफर्सपासून दूर राहावे, असे एनएसईने म्हटले आहे. (NSE Telegram scam warning)
ट्रेडिंग क्रेडेन्शियल्स शेअर करू नका
गुंतवणूकदारांनी आपला User ID, Password यांसारखी ट्रेडिंग क्रेडेन्शियल्स कोणत्याही व्यक्तीसोबत शेअर करू नयेत, असेही एनएसईने स्पष्ट केले आहे. कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेशी आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी त्यांची अधिकृतता तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी एनएसईच्या वेबसाइटवर ‘Know/Locate your Stock Broker’ सुविधा उपलब्ध आहे. या माध्यमातून संबंधित नोंदणीकृत सदस्य तसेच त्यांच्या अधिकृत व्यक्तींची माहिती तपासता येते. याशिवाय, ट्रेडिंग सदस्यांनी एनएसईकडे जाहीर केलेली गुंतवणूकदारांच्या पैशांच्या व्यवहारासाठीची अधिकृत ग्राहक बँक खातीही तपासता येतात. (NSE Telegram scam warning)
फसवणूक झाल्यास संरक्षणाच्या सुविधा मिळणार नाहीत
अशा प्रतिबंधित योजनांमध्ये सहभागी होणे ही गुंतवणूकदारांची स्वतःची जोखीम, खर्च आणि परिणामांची जबाबदारी असल्याचे एनएसईने म्हटले आहे. अशा योजनांना एनएसईची मान्यता किंवा समर्थन नसते. अशा योजनांशी संबंधित वाद उद्भवल्यास गुंतवणूकदारांना एनएसईच्या अधिकारक्षेत्रातील गुंतवणूकदार संरक्षणाचे लाभ, एक्स्चेंजची विवाद निवारण यंत्रणा तसेच एक्स्चेंजमार्फत उपलब्ध होणारी तक्रार निवारण यंत्रणा उपलब्ध होणार नाही, असे एनएसईने स्पष्ट केले आहे. ‘गुंतवणूकदारांच्या हितासाठी जारी’ करण्यात आलेल्या या प्रसिद्धीपत्रकाद्वारे एनएसईने गुंतवणूकदारांना अशा प्रकारच्या संशयास्पद गुंतवणूक योजनांबाबत विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन शेअर बाजारातील ‘Trading Expert’ टेलिग्राम चॅनेलपासून सावध राहा! एनएसईचा गुंतवणूकदारांना इशारा दिला आहे. (NSE Telegram scam warning)