'एमपीएससी' आंदोलन मागे घेताना रोहित पवारांची तारांबळ!

विद्यार्थ्यांना खोटे आश्वासन देणे पडले महागात; रोहित दादांचा विद्यार्थ्यांकडूनच लाईव्ह समाचार

 
MPSC Students Protest
 
मुंबई (MPSC Students Protest): महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विविध मागण्यांसाठी गेल्या १२ दिवसांपासून पुण्यात सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले. मात्र, आंदोलनाची सांगता होत असताना आमदार रोहित पवार यांना विद्यार्थ्यांची समजूत काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. आंदोलन मागे घेण्याबाबत रोहित पवार आग्रही असताना विद्यार्थी मात्र एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम राहिल्याने आंदोलनस्थळी पेच निर्माण झाला होता. अखेर भीमनवार यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत सक्तीच्या रजेवर जात असल्याचे जाहीर केल्यानंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
आंदोलनाच्या अंतिम टप्प्यात विद्यार्थ्यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे सरकार आणि आंदोलक यांच्यातील चर्चेला निर्णायक वळण मिळाले. अध्यक्षांचा राजीनामा घेतल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे केवळ शासनाकडून आश्वासन मिळाल्याने आंदोलन संपवण्यास विद्यार्थी तयार नव्हते. भीमनवार यांनी स्वतः समाजमाध्यमांवर सक्तीच्या रजेवर जात असल्याची घोषणा केल्यानंतरच आंदोलन स्थगित करण्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली.
 
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा मसुदा आवश्यक तांत्रिक बाबींची पूर्तता करून मुख्य सचिवांच्या स्वाक्षरीसह आमदार रोहित पवार आणि आमदार विश्वजीत कदम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. तसेच, विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीच्या सचिवपदी ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली. (MPSC Students Protest)
 
मध्यरात्रीपर्यंत सुरू होता पेच
 
आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू असतानाच सरकारकडून भीमनवार यांच्या सक्तीच्या रजेबाबत निर्णय झाल्याची माहिती देण्यात आली. मात्र, प्रत्यक्ष घोषणा होईपर्यंत विद्यार्थी आंदोलन मागे घेण्यास तयार नव्हते. यावेळी रोहित पवार यांनी सरकारला दहा मिनिटांची मुदत देण्याचे सांगितले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. अखेर मध्यरात्री १ वाजून २४ मिनिटांनी विवेक भीमनवार यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर सक्तीच्या रजेवर जात असल्याची पोस्ट केली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आंदोलनाची सांगता झाली असली, तरी शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थ्यांना राजी करण्यासाठी रोहित पवारांना करावी लागलेली कसरतच चर्चेचा विषय ठरली. (MPSC Students Protest)
 
विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे
 
आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासह विद्यार्थ्यांना, क्लासचालकांना आणि संबंधितांना देण्यात आलेल्या नोटिसा मागे घेण्याची भूमिका शासनाने स्पष्ट केली. याशिवाय राज्यातील रिक्त पदे पुढील तीन वर्षांत भरणे, २०२६ मध्ये सुमारे ७० हजार पदांच्या मेगाभरतीसाठी कालबद्ध नियोजन करणे, गट-क परीक्षांमधील पदसंख्या वाढवणे आणि २०२७ मधील गट-ब व राज्यसेवा परीक्षांमध्ये अधिक जागा उपलब्ध करून देणे, अशा मागण्यांवरही शासनाने सकारात्मक भूमिका घेतली. एमपीएससीच्या सदस्यसंख्येत वाढ, परीक्षांचे वार्षिक वेळापत्रक, उत्तरतालिका ७२ तासांत प्रसिद्ध करणे, विविध विभागांच्या भरती परीक्षा आयोगामार्फत घेणे आणि स्पर्धा परीक्षार्थींच्या शिष्यवृत्तीच्या जागा वाढवणे यांसारख्या मुद्द्यांवरही कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले. (MPSC Students Protest)
 
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर