अर्थव्यवस्थेच्या वाढीबरोबर भांडवली बाजारपेठही विस्तारते. याचा थेट फायदा शेअर मार्केट, डिपॉझिटरी, म्युच्युअल फंड आणि वेल्थ मॅनेजमेंट कंपन्यांना होतो. निवडक कंपन्यांचे वर्चस्व असलेल्या या क्षेत्रात गेल्या काही वर्षांत चांगली वाढ झाली आहे. अशाच महत्त्वाच्या कंपन्यांपैकी एक म्हणजे, ‘मल्टी-कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया’ म्हणजेच ‘एमसीएक्स’! त्याविषयी सविस्तर...
भांडवली बाजारातील कंपन्यांची त्यांच्या क्षेत्रात मक्तेदारी असते. उदाहरणे द्यायची तर- शेअर बाजारात राष्ट्रीय आणि मुंबई शेअर बाजार; ‘डिपॉझिटरी’त ‘सीडीएसएल’ आणि ‘एनएसडीएल’; म्युच्युअल फंड ट्रान्सफर एजन्सीमध्ये ‘कॅम्स’ आणि ‘के-फिन’ अशा मोजक्या कंपन्यांची मक्तेदारी आहे. ऊर्जा आणि ‘कमोडिटी एक्सचेंज’ क्षेत्रातसुद्धा एक-दोनच मोठ्या कंपन्या आहेत. यामुळे या सर्व कंपन्यांच्या व्यवसायात आणि शेअरच्या भावात गेल्या काही वर्षांमध्ये उत्तम वाढ झाली आहे. भारताच्या तुलनेत जागतिक व्यापारी मालाचा बाजार अधिक प्रगत आहे. यात रोकड आणि ‘डिलिव्हरी’ असे दोन्ही प्रकारे व्यवहार केले जातात. अमेरिकेत ‘सीएमई’, ‘सीबॉट’, ‘नायमेक्स’ आणि ‘कॉमेक्स’ ही प्रसिद्ध एक्सचेंज आहेत. युरोपमध्ये ‘आयसीई’ आणि ‘एलएमई’, तर चीन व जपानमध्येही मोठी एक्सचेंज आहेत. या सर्व एक्सचेंजमध्ये खनिज तेल, नैसर्गिक वायू, कोळसा, सोने, चांदी, सर्व प्रकारचे धातू याबरोबरच मका, सोयाबीन, कोको, साखर, कापूस, गहू, फळे अशा अनेक प्रकारच्या कृषी उत्पादनांचे व्यवहार होतात. गुरांच्या खरेदी-विक्रीचे आणि वाहतुकीच्या करारांचेही व्यवहार होतात. ही एक्सचेंज मोठ्या जागतिक बाजारपेठा आहेत. या तुलनेत भारतात या ‘कमोडिटी एक्सचेंज’ क्षेत्रात अजून बर्याच मालाचा समावेश झालेला नाही, म्हणून वाढीला भरपूर वाव आहे.
भारतात ‘कमोडिटी’चा म्हणजे व्यापारी मालाचा बाजार सुमारे ५० लाख कोटी रुपयांचा आहे. ‘एमसीएक्स’मध्ये होणारी ‘फ्युचर्स’ आणि ‘ऑप्शन्स’ची दैनिक उलाढाल सुमारे ५.४ लाख कोटी रुपयांची आहे. ‘एमसीएक्स’ भारतातील अग्रगण्य ‘इलेक्ट्रॉनिक कमोडिटी डेरिव्हेटिव्हज एक्सजेंच’ कंपनी आहे. यात ‘फ्युचर्स’ आणि ‘ऑप्शन्स’ करारांचे ट्रेडिंग होते. यामुळे ‘कमोडिटी’ उत्पादक, व्यापारी, ज्वेलर आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांना व्यापारी मालाच्या किमतीतील चढ-उतारांपासून संरक्षण मिळते. भारतीय कमोडिटी मार्केटमध्ये या कंपनीचा बाजारहिस्सा सुमारे ९५ टक्के आहे. बाकी वाटा ‘एनएसई’ आणि ‘बीएसई’चा आहे. कंपनीचा मुख्य महसूल व्यवहार शुल्काच्या स्वरूपात येतो. यात ९५ टक्के उत्पन्न (‘ऑप्शन्स’ ७५ टक्के आणि ‘फ्युचर्स’ २५ टक्के) व्यवहारांच्या शूल्कातून, तर बाकी पाच टक्के उत्पन्न इतर स्रोतांमधून येते. एकूण उलाढालीत सोने-चांदी आणि ऊर्जा करारांचा वाटा अनुक्रमे ६९ टक्के आणि २९ टक्के इतका आहे. बाकी धातू आणि कृषी उत्पादनांचा वाटा तुलनेने फार कमी आहे. ‘सेबी’ने परदेशी ‘पोर्टफोलिओ’ गुंतवणूकदारांना भारतीय कमोडिटी बाजारात कृषी उत्पादने वगळता, इतर विभागात रोकड आधारित व्यवहार करण्याची परवानगी दिली आहे. बाकी व्यवहारांसाठी नवे धोरण विचाराधीन आहे. कंपनी डिजिटल पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानावर वार्षिक ५० ते ८० कोटी रुपयांच्या आसपास खर्च करीत आहे. यात प्रामुख्याने सर्व्हर क्षमता वाढविणे, डेटा सेंटरचे सबलीकरण, सायबर सुरक्षेवर आणि ‘अल्गो’ ट्रेडिंगसाठी लॅटेन्सी कमी करण्यासाठीही खर्च आहे. नवनवीन कमोडिटीमध्ये ‘ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट’, संस्थात्मक गुंतवणूकदारांचा म्हणजे म्युच्युअल फंड, बँक आणि ‘एफपीआय’चा कमोडिटी बाजारातील वाढता सहभाग, निर्देशांक करारांचा प्रसार, कोल एक्सचेंज आणि विद्युत ऊर्जा करार हे नवे उपक्रम, जागतिक अनिश्चितता व अस्थिरतेमुळे, कच्च्या तेलाच्या भावातील आणि सोन्या-चांदीच्या भावातील चढ-उतारामुळे ‘हेजिंग’ची मागणी वाढणे, हे कंपनीसाठी व्यवसायवाढीचे प्रेरक घटक आहेत. जागतिक कमोडिटी बाजारपेठेत बर्याच प्रकारचे, विशेषतः कृषी मालाचे व्यवहार केले जातात.
भारतात अद्याप कमोडिटी बाजारपेठेत कृषी मालाचा वाटा नगण्य आहे. भारतात दरवर्षी सुमारे ३५ ते ४० लाख कोटी रुपयांहून अधिक मूल्याचे धान्य, डाळी, तेलबिया आणि कापूस यांसारख्या वस्तूंचे उत्पादन व खरेदी-विक्री होते आणि त्यातील काही थोडा वाटा ‘डेरिव्हेटिव्ह’ बाजारात येऊ शकतो. पण, मार्च २०२६ मध्ये ‘सेबी’ने तांदूळ, गहू, चणे, मोहरी, सोया, मूग आणि पामतेलाच्या ‘डेरिव्हेटिव्ह’वरील निलंबन एक वर्षाने वाढविले. राजकीय आणि महागाईवर परिणाम करणार्या वरील कृषी उत्पादनांच्या ‘डेरिव्हेटिव्ह’वर नियंत्रण आणि इतर कृषी उत्पादने टप्प्याटप्प्याने ‘डेरिव्हेटिव्ह’ बाजारात खुली करण्याचे ‘सेबी’चे धोरण आहे. त्यानुसार, ‘सेबी’ने नुकतेच मका, भुईमूग आणि मिरची या उत्पादनांच्या रोख आधारित ‘डेरिव्हेटिव्ह’ सुरू करण्यासाठी संबंधित संस्थांनी मते मागविली आहेत. याचा फायदा ‘एमसीएक्स’ला होऊ शकतो. पण, ‘एनसीडीएक्स’ या मुख्यतः कृषी डेरिव्हेटिव्ह मंच असलेल्या कंपनीला याचा जास्त फायदा होईल. ‘एनएसई’ हे देशातील सर्वांत मोठे एक्सचेंज आहे. सध्या ‘एनएसई’ने ‘आयपीओ’ बाजारात आणल्यामुळे ती चर्चेत आहे. ‘एनएसई’चा ‘कमोडिटी ट्रेडिंग’मधील सध्याचा बाजारहिस्सा नगण्य असला, तरी त्यांच्याकडून भविष्यात उभी राहणारी स्पर्धा विचारात घेणे गरजेचे आहे. कोणत्याही एक्सचेंजवर जितके जास्त ग्राहक असतात, तितकी जास्त तरलता आणि उत्तम ‘प्राईस डिस्कव्हरी’ त्या एक्सचेंजमधील व्यवहारांना मिळते. यालाच ‘नेटवर्क इफेक्ट’ही म्हणतात. अशा व्यवहारांमध्ये ‘बिड-आस्क स्प्रेड’ म्हणजे, खरेदी आणि विक्रीच्या बोलीतील फरक कमी पडतो आणि यामुळेच योग्य किंमत मिळते. खूप ग्राहक असल्याने हा फरक ‘एमसीएक्स’च्या व्यवहारांमध्ये ‘एनएसई’ आणि ‘बीएसई’पेक्षाही कमी असतो. त्यामुळे जोपर्यंत ‘एनएसई’वर ‘एमसीएक्स’सारखी प्रचंड तरलता निर्माण होत नाही, तोपर्यंत मोठे ट्रेडर आणि संस्थात्मक गुंतवणूकदार ‘एमसीएक्स’ सोडण्याची शक्यता खूप कमी आहे. हीच बाब आपण ‘आयईएक्स’ बाबतही जाणून आहोत. तरी भारतात बहुतांश रिटेल ट्रेडर ‘इक्विटी’ आणि ‘एफ अॅण्ड ओ’साठी ‘एनएसई’चा वापर करतात. ‘एनएसई’ एकाच खात्यातून आणि ‘ब्रोकर मार्जिन’ मधून ‘कमोडिटी ट्रेड’ करण्याची सोय देते. यामुळे नवे किंवा लहान रिटेल ट्रेडर जे नव्याने ‘कमोडिटी’ मार्केटमध्ये येत आहेत, ते स्वतंत्रपणे ‘एमसीएक्स’वर जाण्याऐवजी ‘एनएसई’वरच ट्रेड करणे पसंत करू शकतात. त्यामुळे ‘एमसीएक्स’च्या नव्या ग्राहक संपादनाच्या वेगावर परिणाम होऊ शकतो. ट्रेडरला आकर्षित करण्यासाठी ‘एनएसई’ कमोडिटी श्रेणीत व्यवहार शुल्कावर सूट किंवा सवलत देते. त्यामुळे आपले ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी ‘एमसीएक्स’ला भविष्यात व्यवहार शुल्क कमी करावे लागू शकते. यामुळे ‘एमसीएक्स’च्या कार्यचालन मार्जिनवर थोडा ताण येऊ शकतो. ‘एमसीएक्स’चे बाजारमूल्य ८६ हजार ६९७ कोटी रुपये असून, व्यवसाय आणि नफा गेल्या पाच वर्षांमध्ये ४४ टक्के आणि ४८ टक्के वाढला आहे. गेल्या तीन वर्षांतील वाढ तर सोने-चांदी आणि खनिज तेलाच्या भावांमध्ये झालेल्या वाढीमुळे ६९ टक्के आणि ९९ टक्के इतकी जास्त आहे. ‘आरओसीई’ आणि ‘आरओई’ अनुक्रमे ५७.९ आणि ४३.४ म्हणजे, अतिउत्तम आहेत. कार्यचालन मार्जिन ७१ टक्के मजबूत आहे. कंपनीचा ताळेबंद ७ हजार ५०१ कोटी रुपयांचा असून, त्यात तब्बल ३ हजार ९१६ कोटी रुपये म्हणजे, ताळेबंदाच्या ७२ टक्के रक्कम रोख आणि गुंतवणुकीच्या स्वरूपात आहे. कंपनी कर्जमुक्त आहे. ताळेबंद मजबूत आहे. केवळ एकच टेक्नोलॉजी प्लॅटफॉर्म असल्याने कंपनीला खेळत्या भांडवलाची गरजच पडत नाही. रोकड आवक उत्तम आहे. मात्र, भू-राजकीय परिस्थितीमुळे आणि सोने-चांदी आणि खनिज तेलाच्या भावातील वाढीमुळे नफा आणि सर्वच आकडे खूप वाढले आहेत. पुढील काळात ते कमी होण्याची शक्यता आहे. कंपनीचा शेअर सध्या ५६.२ या ‘पीई’ गुणोत्तरास उपलब्ध आहे. जे पाच वर्षांच्या ५९.६ या सरासरी गुणोत्तरापेक्षा कमी आहे. नफावाढ उत्तम असल्याने ‘पीईजी’ ०.५७ आहे. ‘ईव्ही’/‘ईबीआयटीडीए’ गुणोत्तर ३३.९ आहे, जे ‘बीएसई’पेक्षा कमी आहे. कंपनीला प्रवर्तक नसून, एक व्यावसायिक व्यवस्थापन कंपनी चालविते.
‘एमसीएक्स’ ही या क्षेत्रातील ९५ टक्के बाजारहिस्सा असलेली आणि भारतीय भांडवली बाजारातील एक उत्तम कंपनी आहे. आगामी काळात अस्थिर भू-राजकीय परिस्थिती आणि इतर पूरक कारणांमुळे कंपनीचा व्यवसाय आणखी वाढेल, असे वाटते. नफावाढीच्या दृष्टीने मूल्यांकन ठीक आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी या कंपनीचा अभ्यास करणे इष्ट ठरते.