मध्य आशियाच्या हृदयात नरेंद्र मोदी...

    02-Sep-2026   
 
PM Narendra Modi Uzbekistan Visit
 
‘शांघाय सहकार्य परिषदे’च्या निमित्ताने किर्गिझस्तानची राजधानी बिश्केक येथे जाताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दि. ३०-३१ ऑगस्ट या कालावधीत ‘मध्य आशियाचे हृदय’ म्हणून ओळख असलेल्या उझबेकिस्तानला भेट दिली. उझबेकिस्तानचे अध्यक्ष शौकत मिर्झियोयेव यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. त्यानिमित्ताने उझबेकिस्तानचा इतिहास, वर्तमान आणि भारताशी असलेल्या मैत्रिपूर्ण संबंधांचा आढावा घेणारा हा लेख...
 
आज भारतासाठी उझबेकिस्तान मध्य आशियाचे प्रवेशद्वार बनले आहे. दोन्ही देशांतील व्यापार १ अब्ज डॉलरच्या वरती गेला असून, २०३० पर्यंत तो ५ अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. राष्ट्रपती शौकत मिर्झियोयेव २०१६ पासून सत्तेत असून, त्यापूर्वी ते पंतप्रधान होते. नरेंद्र मोदींचे त्यांच्याशी अत्यंत घनिष्ठ संबंध असून, दोघांची आतापर्यंत अनेकवेळा भेट झाली आहे. हे भारत आणि उझबेकिस्तानमधील राजनयिक संबंधांचे ३५वे वर्ष असून, मोदींच्या भेटीदरम्यान त्यांचा स्तर उंचावून त्यांना बृहत् सामरिक भागीदारीचा दर्जा देण्यात आला. भारत आणि उझबेकिस्तानमध्ये युरेनियम पुरवठ्याबाबत, तसेच खाणकाम क्षेत्रातील सहकार्याबाबत करार करण्यात आला. भारताची ‘यूपीआय’ आणि उझबेकिस्तानची ‘हुमो’ या पैसे पाठवण्याच्या यंत्रणांमध्ये सहकार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. उझबेकिस्तान राजधानी ताश्कंदजवळ एक नवीन शहर वसवत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अध्यक्ष मिर्झायेव यांना एक शिष्टमंडळ गुजरातमधील ‘गिफ्ट सिटी’मध्ये पाठवण्याची विनंती केली.
 
दोन्ही देशांमध्ये बुद्धकाळापासून किंबहुना, त्यापूर्वीपासून सांस्कृतिक देवाणघेवाण होत आहे. भारतावर स्वारी करून प्रचंड उत्पात माजवणारा तैमूर लंग हा उझबेकिस्तानचा राष्ट्रीय नायक असून, त्याला तिथे ‘अमिर तिमूर’ असे म्हटले जाते. अयोध्येच्या श्रीराम मंदिरासह अनेक मंदिरांचा विध्वंस करणारा बाबरही मूळचा समरकंदचा होता. पण, त्याने उझबेकिस्तान सोडून भारतात राज्य स्थापन केल्यामुळे तिथे त्याला फारसा मान नाही. कालांतराने या भागावर इराणची आणि त्यानंतर झारच्या रशियाची सत्ता आली. रशियामध्ये ‘लाल क्रांती’ झाल्यावर मध्य आशियाई देशांचे स्वातंत्र्य घोषित करण्यात आले असले, तरी जोसेफ स्टॅलिनच्या काळात हा भाग पुन्हा एकदा रशियाला जोडला जाऊन सोव्हिएत महासंघाचा भाग झाला. याकाळात उझबेकिस्तानवरील धार्मिक ओळख पूर्णपणे पुसून टाकण्यात आली. खूप मोठ्या संख्येने रशियन लोकांना ताश्कंद आणि अन्य महत्त्वाच्या शहरांमध्ये वसवण्यात आले. नाझी जर्मनीच्या आक्रमणाच्या काळात सोव्हिएत महासंघाने आपले कारखाने देशाच्या पश्चिम भागातून पूर्व भागात स्थलांतरित केले. दुसर्‍या महायुद्धामध्ये उझबेक लोकांनी मोठ्या संख्येने प्राणांची आहुती दिली. नरेंद्र मोदींनी ताश्कंदमधील युद्ध स्मारकासही भेट दिली.
 
उझबेकिस्तान महाराष्ट्र आणि छत्तीसगढ एकत्रित केल्यावर होतो, साधारण तेवढ्या आकाराचा. देशाची लोकसंख्या अवघी पावणेचार कोटी. हा जगातील असा देश आहे, ज्याला समुद्रकिनारा नाही, तसेच याच्या एकाही शेजारी देशास समुद्रकिनारा नाही. मध्य आशियातील सर्व देशांशी उझबेकिस्तानची सीमा आहे. पहिल्या ते तिसर्‍या शतकादरम्यान हा प्रदेश बौद्ध धर्मीय कुशाण साम्राज्याचा भाग होता. मोदींच्या दौर्‍यामध्ये या बौद्ध वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यासंबंधी भारत आणि उझबेकिस्तानमध्ये करार करण्यात आला. पुढे या भागावर पर्शियन आणि श्वेतवर्णीय हूण लोकांनी राज्य केले. सहाव्या शतकाच्या अखेरीस हा भाग तुर्कीक वंशीय लोकांच्या प्रभावाखाली आला. आठव्या शतकात अरबांनी या भागावर राज्य करताना तिथे इस्लामचा प्रसार केला. त्यानंतर हा प्रदेश पुन्हा पर्शियन आणि तुर्कीक लोकांच्या प्रभावाखाली आला. १३व्या शतकात मंगोलियातून चाल करून आलेल्या चंगेझ खानाने बुखारा आणि समरकंद यांसह सर्व महत्त्वाची शहरे उद्ध्वस्त केली. १३७० साली तैमूर लंगने आपले विशाल साम्राज्य उभारताना समरकंद येथे आपली राजधानी स्थापन केली. भारतात आणि आशियात अनेक ठिकाणी ‘क्रूरकर्मा’ म्हणून ओळखला जाणारा तैमूर उझबेकिस्तानमध्ये ‘राष्ट्रीय नायक’ म्हणून ओळखला जातो. तैमूरच्या सहाव्या पिढीतील झहिरुद्दिन महम्मद बाबरने भारतावर आक्रमण करून मुघल साम्राज्याची स्थापना केली. बाबर उझबेकिस्तानचा असला, तरी तेथील लोकांना त्याच्याबद्दल आत्मीयता नाही. त्यानंतर १७व्या शतकात हा प्रदेश उझबेक टोळ्यांच्या आणि कालांतराने १९व्या शतकात झारच्या रशियाच्या साम्राज्याचा भाग झाला. ‘लाल क्रांती’नंतर सोव्हिएत रशियामध्ये त्याची वेगळी ओळख होती. १९९१ मध्ये सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर उझबेकिस्तानला स्वातंत्र्य मिळाले. तुर्कीक लोकसंख्या, पर्शियन संस्कृती आणि साम्यवादी रशियाचे सुमारे सात दशके राज्य, यामुळे उझबेकिस्तानची एक वेगळी ओळख तयार झाली आहे.
 
हा देश ‘सुन्नी’ मुस्लीमबहुल असला, तरी तो तितकाच आधुनिक आणि उदारमतवादी आहे. १९६६ सालच्या भूकंपानंतर राजधानी ताश्कंद नव्याने बांधली असल्यामुळे तिच्यावर सोव्हिएत रशियाच्या स्थापत्यशैलीचा प्रभाव जाणवतो. भारत आणि रशियाच्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे या भागात हिंदी चित्रपट आणि संगीत लोकप्रिय आहे. देशाची भाषा ‘उझबेक’ असली, तरी व्यवसाय-उद्योगासाठी रशियन भाषेचाही मोठ्या प्रमाणावर वापर होतो. सध्या या भाषात इंग्रजीबद्दल विशेष आकर्षण असून, ठिकठिकाणी इंग्रजी शिक्षणाच्या जाहिरातीही दिसतात.
 
उझबेकिस्तानमध्ये चीन आणि तुर्कीये आपला प्रभाव निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत. उझबेकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक वायू आणि खनिजसंपत्ती आहे. देशाचा पश्चिमेकडील भाग वाळवंटी असला, तरी अमु दर्या आणि सिर दर्या या नद्यांवरील सिंचन प्रकल्पांमुळे कृषी क्षेत्राचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे. चीनसाठी हा भाग ‘बेल्ट-रोड’ प्रकल्पाचा भाग असल्याने त्यांनी पायाभूत सेवा विकास प्रकल्पांत मोठी गुंतवणूक केली आहे. अनेक भारतीय कंपन्याही उझबेकिस्तानमध्ये पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात काम करत आहेत. तुर्कीयेचे अध्यक्ष एर्दोगान यांचे ओटोमन साम्राज्य पुनरुज्जीवित करण्याचे स्वप्न असल्यामुळे त्यांनीही तुर्कीक वंशीय देशांमध्ये आपले चित्रपट, भाषा आणि संगीत यांचा प्रसार करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. उझबेकिस्तानवर विविध संस्कृतींचा प्रभाव असल्यामुळे आणि साम्यवादी राजवटीतील सुमारे सात दशके अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच असल्यामुळे आपल्या ओळखीबद्दल तेथील लोकांच्यात संभ्रम जाणवतो.
 
वयाची पन्नाशी गाठलेल्या उझबेक लोकांना मद्य पिण्यास किंवा कोणतेही भोजन करण्यास हरकत नसते. वेशभूषेच्या बाबतीतही ते मोकळेढाकळे असतात. पण, तरुण मुली अनेकदा डोयाला तुर्कीश पद्धतीची चादर लपेटतात. तरुण दाढी राखतात. ‘हलाल’ पद्धतीच्या जेवणाबद्दल आग्रही असतात. असे असले तरी अजूनही उझबेकिस्तानमध्ये फरगणा खोर्‍याचा अपवाद वगळता, इस्लामिक मूलतत्त्ववादाचा प्रभाव नाही. भारतासाठी या स्पर्धेत टिकून राहणे महत्त्वाचे आहे. ताशकंद नवी दिल्लीपासून विमानाने अवघ्या दोन तासांच्या अंतरावर असले, तरी दोन्ही देशांची सीमा जोडलेली नसणे, ही मोठी अडचण आहे.
 
उझबेकिस्तान हा ऑस्ट्रेलियाच्या खालोखाल पाचवा सर्वांत मोठा युरेनियम उत्पादक देश आहे. मोदींच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यादरम्यान भारताने ऑस्ट्रेलियाशीही युरेनियम पुरवठ्याबाबत करार केला होता. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ क्षेत्रामुळे ‘सिलिकॉन चिप्स’ उत्पादन आणि ‘डेटा सेंटर’सारख्या क्षेत्रांना चालना मिळाली आहे. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे हायड्रोकार्बनला सशक्त पर्याय शोधणे आवश्यक आहे. भारत सौरऊर्जेच्या बाबतीत भरीव कामगिरी करत असला, तरी शाश्वत ऊर्जेसाठी अणुऊर्जेला पर्याय नाही. छोट्या ‘मॉड्युलर रिअ‍ॅटर’मुळे मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पांबाबत असलेला धोका मोठ्या प्रमाणावर कमी करता येतो. नरेंद्र मोदींच्या उझबेकिस्तान दौर्‍यामुळे भारताने मध्य आशियाच्या राजकारणात आणि अर्थकारणात आपल्यालाही स्वारस्य असल्याचे दाखवून दिले आहे.




अनय जोगळेकर

आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारणाचे अभ्यासक असून राजकीय घडामोडींचे विश्लेषक आणि विशेष प्रकल्पाधिकारी म्हणून ते गेली १२ वर्षं कार्यरत आहेत. वाणिज्य शाखेतील पद्व्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली आहे. एकात्मिक जलव्यवस्थापन या विषयात ते मुंबई विद्यापीठातून पीएचडी करत आहेत.  इंटरनेट, तंत्रज्ञान, समाज माध्यमं आणि जागतिकीकरण हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत. संगणकीय मराठी आणि भारतीय भाषांमध्ये माहिती तंत्रज्ञान सहजतेने उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी काम केले असून सध्या राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळात ते अशासकीय सदस्य म्हणून कार्यरत आहेत. मुक्त स्तंभलेखक म्हणून ते गेली ८ वर्षं विविध वर्तमानपत्र तसेच ब्लॉगच्या माध्यमातून लिहित आहेत.

संबंधित मजकूर