मनोज जरांगेंचा मुंबई दौरा तूर्तास रद्द ; 20 दिवसांनी आंदोलन मागे

मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करु: मुख्यमंत्री फडणवीस

 
  Manoj Jarange Mumbai Protest 
मुंबई (Manoj Jarange Mumbai Protest) : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी (दि. १७ सप्टेंबर) अखेर आंदोलनाच्या २० व्या दिवशी उपोषण सोडले. मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी ते मुंबईच्या दिशेने निघाले होते. पण त्यांनी उपोषण तूर्तास मागे घेत मुंबई दौरा स्थगित केला. त्यांनी सरकारला त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली आहे. (Manoj Jarange Mumbai Protest)
जरांगेंची तब्येत खालावल्याने मराठा आंदोलकांनी चिंता व्यक्त केली होती. त्यांच्यावर उपचार सुरु असल्याने त्यांचा मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोदा येथेच राहिला. आज त्यांचा अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे मुक्काम होणार होता. ते श्रीगोंदाकडे रवाना होण्यापूर्वी गुरुवार, दि.१७ सप्टेंबर रोजी पहाटे पाटोदा येथे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री दादा भुसे, आमदार प्रसाद लाड आणि सुरशे धस यांच्या शिष्टमंडळाने जरांगेंची भेट घेतली. यावेळी सरकारचे शिष्टमंडळ आणि जरांगे यांच्यात विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली. सरकारकडून ठोस आश्वासन मिळाल्यानंतर जरांगेंनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला. (Manoj Jarange Mumbai Protest)
जरांगे पाटील यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर सरकारने कार्यवाही सुरु केली आहे. त्यांच्या मागण्यांवर सरकारची भूमिका सकारात्मक आहे. यामुळे त्यांनी आता उपोषण सोडावे, अशी विनंती विखे पाटील यांनी केली. तर प्रसाद लाड यांनी, जरांगेंच्या तब्येतीची सरकारला काळजी असल्याचे म्हटले. हैदराबाद गॅझेटियरनुसार उद्यापासून प्रमाणपत्रे देणे सुरु करावेत. त्यासाठी ९० दिवसांची मुदत देत आहोत. तीन महिन्यांनी तितक्याच ताकदीने हे आंदोलन सुरु होईल, असा इशारा त्यांनी दिला. (Manoj Jarange Mumbai Protest)
सातारा संस्थान, कोल्हापूर, औंध, पुणे गॅझेटियरची अंमलबजावणी शासन निर्णय (जीआर) काढून करावी लागेल. ५८ लाख कुणबी नोंदीतील एकही नोंद कमी होणार नाही. त्या नोंदीचे वाटप करणे आणि वैधता देण्यासंदर्भात लेखी आश्वासन द्यावे. हैदराबाद गॅझेटच्या संख्येनुसार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन त्याची वैधता द्यावे लागेल. यावर मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला पाहिजे, अशा मागण्या जरांगेंनी शिष्टमंडळासमोर ठेवल्या. त्यावर शिष्टमंडळाने सकारात्मक दर्शवली. ५८ लाख नोंदीतील एकही नोंद कमी होऊ देणार नाही. (Manoj Jarange Mumbai Protest)
मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करु: मुख्यमंत्री फडणवीस
जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. ''जरांगेंनी उपोषण मागे घेतले याचा आम्हाला आनंद आहे. त्यांच्या १३ मागण्यांपैकी १२ मागण्या मान्य केल्या आहेत. एका मागणीवर त्यातील कायदेशीर अडचणी आम्ही सांगितल्या होत्या. ज्या काही मागण्या आम्ही मान्य केल्या आहेत. आमच्या उपसमितीने जी काही आश्वासन दिली आहेत. ती सगळी आम्ही पूर्ण करु. त्यासाठी आवश्यक बैठका घेऊन चर्चा करु. त्याची पूर्तता आम्ही करु. यातील बहुतांश गोष्टी प्रशासकीय आहेत. याबाबत निर्णय झाले आहेत. केवळ त्यातील प्रशासकीय अडचणी दूर करायच्या आहेत. त्या आम्ही दूर करु. सरकारची भूमिका सकारात्मक राहिली आहे. मराठा समाजासाठी मी असेन किंवा एकनाथ शिंदे असतील जेवढे निर्णय आम्ही केले; तेवढे निर्णय कधीच कोणी केलेले नाहीत,'' असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. (Manoj Jarange Mumbai Protest)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर