मुंबई (Seva Sankalp Abhiyan Maharashtra) : राज्य शासनाच्या विविध योजना आणि सेवा पात्र लाभार्थ्यांपर्यंत अधिक सुलभ पद्धतीने पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे. नागरिकांना शासकीय सेवांसाठी वारंवार कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत, तसेच शासन आणि नागरिकांमधील संवाद व लोकसहभाग वाढावा, हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.
अभियानांतर्गत प्रत्येक तालुक्यात ‘सेवा सेतू’ शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. या शिबिरांच्या माध्यमातून फेरफार नोंदी, स्वामित्व सनद, शेतपाणंद रस्ते, शिधापत्रिका, नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र, वनहक्क दावे, नळ व वीज जोडणी, दिव्यांग प्रमाणपत्र, विवाह नोंदणी, आधार, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, शिकाऊ वाहनचालक परवाना, महिला बचत गट नोंदणी, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र तसेच ७/१२ आणि ८-अ नोंदी अद्ययावत करण्यासारख्या सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. (Seva Sankalp Abhiyan Maharashtra)
ग्रामीण भागातील लोकसहभाग वाढविण्यासाठी प्रत्येक गाव आणि वॉर्डात स्थानिक गरजेनुसार ‘सेवा माझे योगदान’ उपक्रम राबविला जाणार आहे. स्वच्छता मोहीम, नदीघाट व बारवांची स्वच्छता, वृक्षारोपण, रक्तदान, आरोग्य तपासणी, प्लास्टिकमुक्ती, जलसंधारण, कचरा वर्गीकरण आणि रस्ता सुरक्षेसारख्या उपक्रमांना यामध्ये प्रोत्साहन दिले जाणार आहे. (Seva Sankalp Abhiyan Maharashtra)
महिला आणि बालकांच्या आरोग्य व पोषणासाठी ‘अंगणवाडी उत्सव’ आयोजित केला जाणार असून, मातांना विविध आरोग्य व पोषण योजनांची माहिती दिली जाईल. अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा कार्यकर्त्यांचा सन्मानही करण्यात येणार आहे. तरुणांच्या कल्पनांना व्यासपीठ देण्यासाठी ‘इनोव्हेशन चॅलेंज’, तर विद्यार्थ्यांसाठी ‘विकसित भारत’ आणि ‘मुलांच्या स्वप्नातील भारत’ या विषयांवर चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत.
दरम्यान, शासकीय योजनांचा लाभ मिळालेल्या नागरिकांच्या घरी जाऊन ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करण्याचा उपक्रमही राबविला जाणार आहे. तसेच योजनांमुळे नागरिकांच्या जीवनात झालेला सकारात्मक बदल ‘बदलाची गोष्ट’ या माध्यमातून व्हिडिओ आणि रील्सद्वारे समाजासमोर आणला जाणार आहे. ‘माहितीअभावी पात्र व्यक्ती वंचित राहता कामा नये’, या भूमिकेतून अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार असून, शासनाच्या सेवा नागरिकांच्या अधिक जवळ नेण्यावर भर दिला जाणार आहे. (Seva Sankalp Abhiyan Maharashtra)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.