मुंबई (BARTI PhD Fellowship) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या वतीने अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील संशोधक विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी आली आहे. बार्टीने सन २०२३, २०२४ आणि २०२५ या तीन वर्षांच्या प्रलंबित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन फेलोशिप’ साठी ऑनलाइन अर्ज सादर करण्यास ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत दुसरी मोठी मुदतवाढ जाहीर केली आहे. बार्टीच्या महासंचालक दीपा मुधोळ-मुंडे यांच्या स्वाक्षरीने याबाबतचे अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
तांत्रिक अडचणी आणि कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून विद्यार्थ्यांकडून होत असलेल्या मागणीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.तीन वर्षांची प्रलंबित फेलोशिप एकाच वेळीगेल्या काही काळापासून बार्टीची फेलोशिप प्रक्रिया रखडल्यामुळे संशोधक विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष होता. मात्र, राज्य सरकारच्या निर्देशानंतर बार्टी प्रशासनाने सन २०२३, २०२४ आणि २०२५ या तिन्ही वर्षांची फेलोशिप प्रक्रिया एकत्रितपणे राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत, ज्या विद्यार्थ्यांची १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत महाराष्ट्रातील किंवा देशातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमध्ये पीएच.डी. साठी कायमस्वरूपी नोंदणी झालेली आहे, ते विद्यार्थी या फेलोशिपसाठी पात्र मानले गेले आहेत. (BARTI PhD Fellowship)
विद्यार्थ्यांच्या मागणीला यश आणि मुदतवाढीची पार्श्वभूमी
या फेलोशिपसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची पहिली मुदत ३१ ऑगस्ट २०२६ रोजी संपली होती. त्यानंतर ती वाढवून १५ सप्टेंबर २०२६ करण्यात आली होती. मात्र, जात वैधता प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलियर, आणि विद्यापीठांची आवश्यक प्रमाणपत्रे मिळण्यास अनेक विद्यार्थ्यांना अडचणी येत होत्या. तसेच बार्टीच्या ऑनलाइन पोर्टलवर एकाच वेळी प्रचंड ताण आल्यामुळे अनेक तांत्रिक अडचणी उद्भवत होत्या. विविध विद्यार्थी संघटना आणि संशोधकांनी मुदतवाढीसाठी मुंबई आणि पुणे येथे प्रशासनाला निवेदने दिली होती. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून बार्टीने आता ३० सप्टेंबर २०२६ च्या रात्री १२ वाजेपर्यंत ऑनलाइन नोंदणी व अर्ज सादर करण्याची अंतिम संधी उपलब्ध करून दिली आहे. (BARTI PhD Fellowship)
एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.