श्रीराम मंदिराच्या पहिल्या 'सीईओ' बाबतचा सस्पेन्स संपणार!

समितीद्वारे अहवाल सुपूर्द; न्यासाकडून नाव घोषित होण्याची शक्यता

    01-Sep-2026   

Shri Ram Temple First CEO
 
 
मुंबई (Shri Ram Temple First CEO) : अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाच्या पहिल्या पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकारीच्या नियुक्तीची प्रक्रिया निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. सीईओ निवडीसाठी स्थापन करण्यात आलेल्या तीन सदस्यीय शोध समितीने मंगळवारी आपला अहवाल न्यासाकडे सुपूर्द केला. श्रीराम मंदिर परिसरात झालेल्या बैठकीनंतर शोध समितीचे अध्यक्ष तथा निवृत्त न्यायमूर्ती प्रमोद कोहली यांनी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांच्याकडे अहवाल सादर केला. यावेळी न्यासाचे अन्य पदाधिकारीही उपस्थित होते. या समितीत निवृत्त लेफ्टनंट जनरल विष्णुकांत चतुर्वेदी आणि माजी बार्क अणुशास्त्रज्ञ सुरेश हवारे यांचाही समावेश आहे. (Shri Ram Temple First CEO)
 
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीराम मंदिर निवड समितीने तीन नावांची अंतिम यादी तयार केली आणि समितीने मंगळवारी आपला अहवाल न्यासाकडे सादर केला. या संदर्भात बोलताना न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज म्हणाले की, या अहवालावर बुधवारी होणाऱ्या न्यासाच्या बैठकीत चर्चा होईल. पहिल्या सीईओच्या नावाची घोषणा होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र नाव जाहीर करायचे की नाही, याचा अंतिम निर्णय न्यासाच घेईल. (Shri Ram Temple First CEO)
 
श्रीराम मंदिर न्यासातील रिक्त पदांवरही बुधवारी नियुक्त्यांची घोषणा होण्याची शक्यता आहे. पूर्वीच्या देणगी गैरव्यवहार प्रकरणानंतर माजी महासचिव चंपत राय आणि न्यासाचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांच्या राजीनाम्यांमुळे तसेच राजा विमलेंद्र मोहन प्रताप मिश्र यांच्या निधनानंतर न्यासामध्ये तीन पदे रिक्त झाली आहेत. या तिन्ही पदांवर नव्या नियुक्त्यांची घोषणा होऊ शकते. (Shri Ram Temple First CEO)
 
अशी माहिती आहे की, न्यासाच्या सचिवपदासाठी जगदीश आफळे यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. त्यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा बुधवारी होण्याची शक्यता आहे. याशिवाय न्यासामध्ये राजा विमलेंद्र मोहन प्रताप मिश्र यांचे पुत्र आणि साहित्यिक यतींद्र मिश्रा, विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय महासचिव बजरंग लाल बांगडा तसेच विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय सल्लागार समितीचे सदस्य दिनेशजी यांचाही समावेश होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. (Shri Ram Temple First CEO)
 
 
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर