मुंबई : (Shri Siddhivinayak Temple) मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरातील देणगीची रक्कम आणि दर्शन व्यवस्थेतील कथित गैरव्यवहाराचे प्रकरण उघडकीस आले आहे. याविषयी श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन मंदिरात सुमारे १८ कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा दावा केला. विविध गैरव्यवहारांच्या प्रकरणांमध्ये आतापर्यंत ४६ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून ९ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणीसुद्धा ट्रस्टकडून करण्यात आली आहे.
या प्रकरणात उबाठाशी संबंधित काही व्यक्तींचाही संबंध असल्याचा आरोप सदा सरवणकर यांनी केला. त्यांनी सांगितले की, मंदिरातील काही कर्मचाऱ्यांच्या हालचाली संशयास्पद वाटू लागल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) यांची मदत घेण्यात आली. त्यानंतर मंदिरातील देणगीची रोकड मोजण्याच्या प्रक्रियेवर विशेष देखरेख ठेवण्यात आली.(Shri Siddhivinayak Temple)
सदा सरवणकर यांच्या म्हणण्यानुसार, एसीबीचे अधिकारी मंदिराच्या विविध प्रवेशद्वारांवर तैनात करण्यात आले होते. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांची तपासणी केल्यानंतर कथित गैरव्यवहार उघडकीस आले आणि संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई सुरू करण्यात आली.(Shri Siddhivinayak Temple)
अशी माहिती आहे की, या प्रकरणात आतापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आली असून ४६ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. मंदिरातील देणगीची चोरी, तसेच नियमबाह्य पद्धतीने पैसे घेऊन भाविकांना दर्शन घडविण्याच्या प्रकारांमध्ये सहभागी असल्याचा आरोप असलेल्या कर्मचाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.(Shri Siddhivinayak Temple)
सरवणकर यांनी राजन पेंडुलकर यास या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचा दावा केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याची भूमिका समोर आल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्याच्याशी संबंधित इतर ८-९ व्यक्तींविरोधातही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. ट्रस्टच्या म्हणण्यानुसार, तपास केवळ देणगीच्या रोकड मोजणीपुरता मर्यादित नसून, मंदिरातील दर्शन व्यवस्थेच्या नावाखाली सुरू असलेल्या इतर कथित गैरप्रकारांचाही तपास करण्यात आला आहे.
हे संपूर्ण प्रकरण पूर्वीच्या ट्रस्ट मंडळाच्या कार्यकाळाशी संबंधित असू शकते, असेही सरवणकर यांनी म्हटले असून या कथित राजकीय संबंधांचीही सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.(Shri Siddhivinayak Temple)
ऑनलाइन पैसे घेऊन दर्शन घडविण्याचा आरोप
श्री सिद्धिविनायक ट्रस्टने व्हीआयपी अथवा विशेष दर्शनाच्या नावाखाली ऑनलाइन पैसे घेऊन दर्शन घडविण्याचा प्रकार सुरू असल्याचाही दावा केला. सरवणकर यांच्या म्हणण्यानुसार, काही व्यक्ती ऑनलाइन पेमेंटच्या माध्यमातून भाविकांकडून पैसे घेऊन त्यांना विशेष दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देत होत्या. या प्रकरणात १९ जणांविरोधात कारवाई करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. मंदिर परिसरातील काही फुलविक्रेत्यांच्या दुकानांमार्फतही भाविकांकडून पैसे घेऊन दर्शनाची व्यवस्था केली जात असल्याची बाब तपासात समोर आल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणातही संबंधितांविरोधात आवश्यक ती कारवाई करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तरी मंदिरातील चोरी, अवैधरित्या पैसे स्वीकारणे किंवा दर्शन व्यवस्थेत गैरव्यवहार करणारा कोणताही कर्मचारी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येत असून संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.(Shri Siddhivinayak Temple)
उबाठाशी संबंध असल्याचा आरोप
ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी उबाठा पक्षाच्या नेत्या विशाखा राऊत यांचे नाव घेत आरोप केला की, कथित गैरव्यवहारात सहभागी असलेल्या काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती त्यांच्या माध्यमातून झाली होती. तसेच अटक करण्यात आलेल्या काही व्यक्तींचा उबाठाच्या स्थानिक शाखांशी संबंध असल्याचाही त्यांनी दावा केला.(Shri Siddhivinayak Temple)